साद-पडसाद : भारतीय समाजाच्या हरवलेल्या आनंदाचा शोध

-यमाजी मालकर

भारतीय समाजाचा आनंद हरवला आहे, याची जी कारणे आहेत, त्याचे मंथन करून अर्थक्रांतीने एक मूळ प्रस्ताव आणि तीन पुरवणी प्रस्तावाच्या मार्गाने तो शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय समाजात आमुलाग्र बदल घडवून आणण्याची पर्यायाने तो आनंद मिळवून देण्याची क्षमता या धोरणात्मक बदल सुचविणाऱ्या प्रस्तावांत आहे.

“सर्वाना आनंदाच्या कवेत घेईल, असा एक सण होऊ दे,’ अशी प्रार्थना बाबा आमटे यांनी केली आहे. यातील “सर्वांना’ हा शब्द फार महत्वाचा आहे. असा आनंद सर्वांपर्यंत पोचवायचा असेल तर भारतासारख्या सुमारे 135 कोटी लोकसंख्येच्या महाकाय देशात धोरणात्मक बदलांना पर्याय नाही. धोरणात्मक बदल याचा अर्थ असा बदल जो सर्वसमावेशक तर आहेच, पण तो समाजाला भेदभावमुक्त करण्याच्या दिशेने जातो. प्रत्यक्षात मात्र असे होते आहे की, अशा दिशाबदलाचा रेटा वाढविण्याऐवजी जे सरकारने केले पाहिजे, ते काही संस्था संघटना अर्धवट पद्धतीने करताना दिसत आहेत. त्यातून काही नागरिकांना समाधान तेवढे मिळते, पण प्रत्यक्षात बदलत काहीच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण गेल्या वर्षभरात एक अनोखा अनुभव येतो आहे. देशात आता आमुलाग्र आणि धोरणात्मक बदलांची गरज आहे, अशी मांडणी करणाऱ्या “अर्थक्रांती’च्या पुणे कार्यालयात देशभरातून येणाऱ्या नागरिकांची रीघ लागली आहे. “आपल्या देशात आता वरवरचे बदल होऊन काहीच उपयोग नाही, मुळातून काही बदलले पाहिजे’, असे ज्यांच्या लक्षात येवू लागले आहे, असे नागरिक “अर्थक्रांती’च्या शोधात या कार्यालयात आपसूक येवून पोचतात. त्यांना खूप काही सांगायचे-करायचे असते. काही सूचत नाही, तेव्हा ते “अर्थक्रांती’ समजून घेतात. आपल्या गावात, संस्थेत “अर्थक्रांती’चे सादरीकरण ठेवतात. या सादरीकरणाला जेव्हा सर्वसामान्य नागरिक गर्दी करतात, तेव्हा त्यांना त्याचे खूप समाधान मिळते.

“भारतीय माणूस चुकला नाही, देशाची धोरणे चुकली आहेत, व्यवस्था चुकली’, असे शब्द कानावर पडेपर्यंत आपण जगण्याच्या शर्यतीत करत असलेल्या तडजोडी म्हणजे किती पाप करत आहोत, या अपराधाच्या भावनेतून ती बाहेर पडू लागतात. आपला देश किती समृद्ध आहे, हे समजून घेतात. या देशातील दारिद्रयाचे खरे कारणही आता त्यांना कळलेले असते. पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे, ती वस्तू नव्हे, यासारख्या अनेक मूलभूत गोष्टी सोप्या शब्दांत ऐकून ते अवाक्‌ होतात आणि आपल्याला हे आतापर्यंत आपल्या पुस्तकांनी किंवा शिक्षणाने का नाही सांगितले, असे प्रश्‍न ते विचारतात. सरकार नव्हे; आपणच देशाचे मालक आहोत, त्यामुळे दररोजच्या घटनांविषयी वितंडवाद करण्यापेक्षा भेदभावमुक्त व्यवस्था आणि धोरणात्मक बदलाविषयी बोलले पाहिजे, हा संकल्प करूनच नागरिक “अर्थक्रांती’शी जोडले जात आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. “अर्थक्रांती’चे देशभरातले हजारो कार्यकर्त्यांची मेहनत व व्यवस्थेतील करेक्‍शनचा बदल नोटबंदीपर्यंत पोचला, त्याचा हा परिणाम आहे.

एवढ्यावर थांबून कसे चालेल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत, सर्वाना आरोग्य आणि शिक्षण अजून मिळत नाहीत. रोजगारसंधी अभावी आपल्या नशिबाला दोष देऊन तरुण खुडून चालले आहेत. नव्या जगात आपले काही अस्तित्वच नाही, या जाणीवेने ज्येष्ठ नागरिक केविलवाणे झाले आहेत. प्रामाणिक नागरिकांची जगतानाची कोंडी अजून थांबलेली नाही. सर्व काही आहे, असे वाटत असतानाच सर्व समाज अस्वस्थ आहे. त्यातील अनेक जण भौतिक सुखही अनुभवत आहेत, पण आनंदी फार कमी. जणू जगण्यातले चैतन्य हरवले आहे. ही भावना अनेकदा प्रबळ का होऊ लागली आहे? त्याचे कारण काहीतरी हरवले आहे. उपजीविकेच्या शर्यतीत काहींचे कुटुंब, काहींचे गाव, काहींचे सणवार.

काहींनी उराशी जपून ठेवलेला भूतकाळ. या एकेकट्याने सापडणाऱ्या गोष्टी नाहीत त्यामुळे त्याचा जे शोध घेत आहेत, त्यांना आता धोरणात्मक बदलासाठीच प्रयत्न केले पाहिजेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. “अर्थक्रांती’शी जोडल्या जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढण्याचे हे खरे कारण आहे. मानवतेची कास धरणारा असा बिनचेहऱ्याचा पण मनाने जोडलेला समूह दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येवू दे. त्याचा भारतीय नावाचा महासमूह होऊ दे. रोमांचकारी, अदभूत मानवी जीवनातून जे जे म्हणून हरवले आहे, ते सापडू दे. या समूहात सामील होण्याचे वेगळे बोलावणे आपल्याला करायला हवे?
असे आहेत अर्थक्रांतीचे चार प्रस्ताव

भारतीय नागरिक म्हणून जे हरवले आहे, ते अर्थक्रांतीने एक मूळ प्रस्ताव आणि तीन पुरवणी प्रस्तावाच्या मार्गाने शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ते असे आहेत-

1. भारतातील अनेक गंभीर सामाजिक समस्यांचे मूळ भारताच्या चुकीच्या आर्थिक रचनेत आहे. त्यास कारणीभूत आहे आपली दोषपूर्ण करप्रणाली आणि दुबळी बॅंकिंग व्यवस्था. त्यामध्ये कोणते बदल केले असता आपल्या अर्थव्यवस्थेपुढील सर्व प्रश्‍न नि:संशयपणे आणि मुळातून सुटू शकतील, याची सूत्रबद्ध मांडणी म्हणजे “अर्थक्रांती’चा पाच कलमी प्रस्ताव. आनंदी भारतीय समाजासाठी गेले 18 वर्षे अर्थक्रांती त्याची मांडणी करत असून नोटबंदी आणि सर्वांसाठी बॅंकिंग या दोन बदलांनी त्याचे महत्व अधोरेखित केले आहे. केवळ भारतच नव्हे तर जगाच्या व्यासपीठांवर मंथन होत असलेला अर्थक्रांतीचा हा मूळ प्रस्ताव.

2. बेरोजगारीच्या गंभीर प्रश्‍नावर “अर्थक्रांती’ने पुरवणी प्रस्तावाची मांडणी केली आहे. रोजगारवाढीसाठी आणि देशाचा आनंदांक वाढण्यासाठी सध्याच्या आठऐवजी सहा तासांची शिफ्ट असावी, देशातील संघटीत क्षेत्रापासून याची सुरवात व्हावी, असा हा प्रस्ताव आहे. उपजीविका करतानाचा जो दबाव आणि क्षोभ वाढला आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवन हे निरस वाटू लागले आहे. दबाव आणि क्षोभातून मुक्ती मिळाल्याशिवाय निखळ आनंद मिळू शकत नाही. या बदलामुळे भारतीयांचा आनंद तर वाढणार आहेच, पण अर्थव्यवस्थेत संघटीत क्षेत्र वाढल्याने समाज एकसंघ होण्यास चालना मिळणार आहे.

3. माणसासाठी अटळ असणाऱ्या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी प्रभावी अशी सामाजिक व्यवस्था असू शकते काय? ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे, असा ज्येष्ठत्वाच्या सन्मानाचा नवा पुरवणी प्रस्ताव अर्थक्रांती देशासमोर ठेवत आहे. कुटुंब आणि कुटुंबाचा आनंद हेच सर्वस्व मानणारा भारतीय तरुण आज “पालकांची दवाई की पाल्यांची पढाई’ या जीवघेण्या संघर्षात अडकला आहे. त्यामुळे आजचे वृद्धत्व केविलवाणे होते आहे. त्याची जागा सन्माननीय ज्येष्ठत्वाला देण्यासाठी या प्रस्तावावर देशव्यापी विस्तृत आणि सखोल मंथन अपेक्षित आहे.

4. सुदृढ लोकशाहीसाठी राजकारणाचे शुद्धीकरण ही अपरिहार्यता आहे. पण राजकारणाच्या खर्चासाठी सूत्रबद्ध, सर्वमान्य अर्थसंकल्पीय आर्थिक तरतूद केल्याशिवाय ते शक्‍य आहे काय? अशी तरतूद कशी करता येईल आणि ती का केली पाहिजे, याची मांडणी करणारा अर्थक्रांतीचा हा तिसरा पुरवणी प्रस्ताव. राजकारण बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही, असे म्हटले जाते. पण ते बदलायचे असेल तर “अर्थक्रांती’च्या या प्रस्तावावर देशात व्यापक मंथन झाले पाहिजे. ज्या राजकारणावर आज देशाची कायदा आणि सुव्यवस्था आणि पर्यायाने भारतीय समाजाचा आनंदांक अवलंबून आहे, त्याच्या शुद्धीकरणाचा मार्ग “अर्थक्रांती’ने देशासमोर ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)