सचिन पायलट की ज्योतिरादित्य सिंधिया; काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे?

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमधील पक्षाच्या निराशाजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेऊन पक्षाचे अध्यक्षपद यापुढेही सांभाळावे अशी आग्रही मागणी पक्षातील जेष्ठ नेत्यांनी केली मात्र राहुल गांधींनी आपल्या निर्णयावर ठाम राहात अध्यक्षपद सोडलं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्याने आणि अध्यक्षपदाचा वारस शोधण्याची जबाबदारीही झटकल्याने सध्या काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशातच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा वारसदार हा तरुण असावा असं मत मांडल्याने युवा नेत्यांच्या तरुण अध्यक्ष निवडीच्या अंतर्गत चर्चाना आणखीनच हवा मिळाली आहे. जरी पक्षातील कोणत्याच नेत्याने अथवा कार्यकर्त्याने आतापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराबाबत सार्वजनिकरित्या मतप्रदर्शन केले नसले तरी पक्षातील अंतर्गत सूत्रांनुसार राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसचा युवा चेहरा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राजस्थान प्रदेश काँग्रेसची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलत राजस्थानात काँग्रेसला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं होतं तर दुसरीकडे ज्योतिरादित्य यांचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव जरी झाला असला तरी त्यांची ओळख अद्यापही एक सक्षम युवानेतृत्व अशीच आहे.

काँग्रेसमधील नेत्यांमध्ये देखील देशातील युवा पिढीला आकर्षित करणारा सर्वपरिचित तरुण चेहराच पक्षाच्या अध्यक्षपदी असावा असा मत प्रवाह असल्याचे समजते. यामुळे सध्या तरी काँग्रेस अध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा झाल्यास सचिन पायलट व ज्योतिरादित्य सिंधिया यांचेच नाव चर्चेत असून अध्यक्षपदी सचिन पायलट की ज्योतिरादित्य सिंधिया अशी चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)