अवजड वाहनांचीही “दुरुस्ती’ करणाऱ्या “सबला’

पिंपरी – एकविसाव्या शतकातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगारातील कार्यशाळेत आला. एसटी बसेस देखभाल दुरुस्ती विभागात (वर्कशॉप) महिला पुरुषांच्या बरोबरीने अवघडातील-अवघड कार्य करीत आहेत. आगाराच्या वर्कशॉपमध्ये सात महिलांची कार्यशाळेत मेकॅनिकल म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. पुरुषांची मक्‍तेदारी समझले जाणारे अवजड वाहनांच्या दुरुस्तीचे कामही महिला मेकॅनिक लिलया पार पाडत आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक विभागात आपल्या कतृत्त्वाची छाप उमटवत महिलांनी एसटीची धुरा आता हळूहळू आपल्या खांद्यावर घेण्यास सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वल्लभननगर येथील आगारात एसटीची देखभाल दुरुस्ती व अन्य तपासणीचे काम करण्यासाठी आगारातील वर्कशॉपमध्ये बसेसची तपासणी केली जाते. यासाठी आगाराच्या कार्यशाळेत पुरुष मेकॅनिक्‍स आहेत. त्याचबरोबर, आता महिला मॅकेनिक देखील आल्या आहेत. मात्र, काम करीत असतांना कुठल्याही प्रकारचे काम पुरुषांने करावे किंवा महिलांनी करावे असा भेदभाव केला जात नसून सरसकट काम केले जात आहे हे विशेष. चाके बदलणे, इंजिनमधील बिघाड दूर करणे, वायरिंग आणि इंजिनमधील इतर तांत्रिक कामे अशी सर्वच व अवजड कामे महिला सहज करीत आहेत.

ही कामे पूर्वी पुरुष कामगार करीत होते. मात्र, गेल्या वर्षी शिवाजीनगर आगारातून विविध ट्रेडनुसार येथे महिला कामगारांना प्रशिक्षित म्हणून पाठवण्यात आले होते. तेव्हांपासून या महिला येथील वर्कशॉपचे काम मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहेत. या महिला मेकॅनिक्‍सने दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, कुठलेच काम अवघड किंवा सोपे नसते आपली आवड महत्त्वाची असून मनातून काम केल्यास महिला-पुरुष याने काही फरक पडत नाही. हा अभियांत्रिकी कोर्स आम्ही आमच्या आवडीनुसार निवडला असून हे काम करतांना आम्हाला काहीच अवघड वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. आगारातील कार्यशाळा विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)