झटपट वजन कमी करण्याची घाई

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये 

स्थूलतेचे दुष्परिणाम समजावून सांगितल्यानंतर “आता वजन कमी करण्याला काही पर्याय नाही’ हे रसिकाला कळून चुकले! ती म्हणाली,
वजन तर कमी करायलाच हवे मला. त्यासाठी मी उद्यापासून रोज सकाळी गरम पाणी – मध – लिंबू घ्यायला सुरुवात करू का?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न! वजन कमी करू इच्छिणाऱ्यांपैकी बहुतांश लोक दिवसाची सुरुवात गरम पाणी – मध – लिंबू याने करतातच!
त्याने काय होईल? मी रसिकाला मुद्दामच विचारले. तिच्या मनातले विचार मला समजून घ्यायचे होते.
त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल रसिका उत्तरली.
कसे काय? मी अधिक खोलात जायचे ठरवले.

ते ना.. त्यामुळे ना… लिंबामध्ये ना… नाही गं नक्की नाही सांगता येणार! पण सगळे असं म्हणतात की सकाळी गरम – पाणी- मध – लिंबू घेतल्याने वजन कमी होते! रसिका चाचरत म्हणाली.
सगळे म्हणजे कोण? शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी आणि इंटरनेट! बरोबर ना? मी हसत विचारले.
खरंय! पण सांग ना, खरंच चांगले असते का मध लिंबू पाणी? आता रसिकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाणी अर्धे लहान लिंबू पिळून व किंचित मध घालून घेणे खरंतर चांगले. लिंबातून “क’ जीवनसत्व मिळते. त्याचे शरीरास अनेक फायदे आहेत. मधामध्ये काही जीवनसत्वे व औषधी गुणधर्म असतात. सकाळचा चहा बंद करून त्याऐवजी असे पाणी घेतले तर फारच उत्तम. पण वजन कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होईल असे मुळीच नाही. ती काय जादूची कांडी आहे? मी म्हणाले.
खरंच? रसिकाचा विश्वासच बसत नव्हता.

हो. शिवाय अनेक जण खूप गरम किंवा उकळत्या पाण्यात लिंबू पिळतात किंवा आदल्या दिवशी चिरून ठेवलेले लिंबू वापरतात. असे केल्यास लिंबामधील “क’ जीवनसत्व निघून जाते. मग लिंबाचा काही फायदा नाही. बाजारात मध शुद्ध मिळेलच याची खात्री नाही आणि मध म्हणायला गेलं तर साखरेसारखाच. कॅलरीजचा विचार केल्यास मधातून साखरेइतक्‍याच कॅलरीज पोटात जातात. बरेच जण सकाळच्या लिंबू-पाण्यात साधारण 2 चमचे (10-15 मिली) मध घालतात. यातून जवळपास 50 कॅलरीज विनाकारण पोटात जातात. मी स्पष्ट केले.
अच्छा. म्हणजे वजन कमी करायला आहारातल्या कॅलरीज कमी कराव्या लागतात तर! रसिका.
हो तर! आहारात अनावश्‍यक कॅलरीज घेणे बंद केले तर वजन निश्‍चितच कमी होते. मी.
बरं, पण काही लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर साध्या पाण्याऐवजी गरम पाणी पितात. त्याने शरीरातील चरबी वितळते म्हणे. त्याचे काय? रसिकाने पुढचा प्रश्न विचारला.

अगं, साधे लॉजिक लाव – गरम पाण्याने चरबी वितळायला हवी असेल तर उकळते पाणी पोटात जायला हवे, दुसरे म्हणजे पोटातली चरबी त्या उकळत्या पाण्याच्या संपर्कात यायला हवी आणि तिसरे म्हणजे ते पाणी गरम असतानाच (चरबी वितळली असतानाच) शरीराबाहेर टाकून द्यायला हवे! या तीनही गोष्टी केवळ अशक्‍य आहेत!! आपण उकळते पाणी पिऊ शकत नाही. पोटातली चरबी ही पोटाच्या त्वचेखाली आणि पोटातील अवयवांभोवती आवरणाच्या स्वरूपात असते. आपण जे खातो-पितो ते या चरबीच्या संपर्कात येतच नाही तर चरबी वितळणार कशी? मी हसू आवरण्याचा प्रयत्न करत म्हणाले.
हे माझ्या लक्षात कसे नाही आले? रसिकाला
स्वतःचाच राग आला.

वजन कमी करण्याच्या बाबतीत बहुतांश लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतात. त्याची सत्यता पडताळून पाहात नाहीत. कित्येक लोक तर वर्षानुवर्षे एखादा उपाय भक्तिभावाने करत रहातात! त्याचा फायदा होत नाही हे दिसत असून देखील!! ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नाही का? मी म्हणाले.
खरंय तुझं. पण मला ना वजन कमी करण्यासाठी असाच काहीतरी सोपा उपाय किंवा शॉर्टकट सांग. मला हे जास्तीचे वजन लवकरात लवकर कमी करून दे (!) रसिका घायकुतीला आली होती.

हे बघ रसिका, वजन कमी करण्यासाठी कोणतेही शॉर्टकट्‌स नसतात. मध-लिंबू-पाण्यासारखा दिवसभराच्या आहारात एखादा सोपा बदल केला आणि उरलेला दिवस अयोग्य आहार घेतला तर वजन कसे बरे कमी होईल? त्यासाठी संपूर्ण दिवसाचा आहार – नव्हे एकूण जीवनशैलीच सुधारायला हवी. मी उत्तरले.
पण असे किती दिवस करावे लागेल? रसिका.
आयुष्यभर! अगं, तू याकडे एखादी शिक्षा किंवा कटकट म्हणून पाहू नकोस. चांगला आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली या काही तात्पुरत्या करायच्या गोष्टी नाहीत. त्या आयुष्यभरासाठी करायला हव्यात आणि फक्त वजनासाठीच नाही तर तुझ्या निरोगी भविष्यासाठी सुद्धा! मी.
आयुष्यभर? अरे बापरे! जर वजन कमी झाल्यावर पुन्हा पहिल्यासारखे खायला-प्यायल्या लागले तर वजन परत वाढेल का? रसिकाने काळजीने विचारले.

जेव्हा आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्यायचे बंद करशील तेव्हा वजन पूर्वपदाला येणारच. सहाजिकच आहे ते. दात स्वच्छ रहावे म्हणून आपण रोज दात घासतो. ते किती दिवस घासायचे असे विचारतो का? आहेत तोपर्यंत घासायचे! दात घासायचे सोडून दिलेस तर ते किडणारच ना? तसेच आहे तुझ्या आहाराचे आणि वजनाचे! मी रसिकाला शांतपणे समजावले.

हं… पटतंय मला… रसिका म्हणाली.
शिवाय झटपट वजन कमी करणे काही चांगले नाही. उपाशी राहून, क्रॅश डाएट करून म्हणजे दिवसभरात फक्त सॅलड – ताक घेऊन, प्रोटीन शेक्‍स / मील रिप्लेसर्स घेऊन पटकन वजन कमी होईलही; पण त्यामुळे थकवा येईल, शरीरातील स्नायूंचे, हिमोग्लोबिनचे, कॅल्शियमचे प्रमाण कमी होईल आणि आगीतून फुफाट्यात जाशील! योग्य आहाराने योग्य प्रमाणातच वजन कमी करणे उत्तम! मी तिला सावध केले.
योग्य प्रमाणात वजन कमी करायचे म्हणजे किती? रसिकाने विचारले.
हे जरी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असले तरी साधारण आठवड्याला अर्धा किलो म्हणजे महिन्याभरात 2 ते 3 किलो वजन कमी करणे केव्हाही सुरक्षित. मी.

या हिशोबाने माझे 20 – 25 किलो वजन कमी करायला 1 वर्ष तरी लागेल! रसिकाने आ वासला!
बरोब्बर! जे वजन गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे ते काही दिवसात कसे कमी होईल? एखादे वर्ष तरी द्यावेच लागेल ना? मी हसत म्हणाले.

आणि वजन कमी करणे हा तर एक भाग झाला. कमी झालेले वजन टिकवून ठेवणे हा त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा भाग आहे! यासाठी योग्य मार्गदर्शनाबरोबरच संयम, चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे लागते. मी.
खरे आहे तुझे. आता माझ्या लक्षात आलंय वजन कमी करणे म्हणजे खायचे काम नाही! रसिका म्हणाली.
क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)