पुणे जिल्हा – ग्रामीण भागात दूध व्यवसाय अडचणीत

केडगाव- शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या दूध व्यवसायाला बाजारभाव घसरल्याने उतरती कळा लागली असून दूध व्यवसाय न केलेला बरा असा सूर उत्पादक शेतकऱ्यांमधून येऊ लागला आहे. ग्रामीण भागात अनेक नागरीक दुधाचा व्यवसाय करुन दैनंदिन गरजा भागवतात. शेती जेव्हा धोका देते. त्यावेळी दुध व्यवसाय ग्रामीण भागात व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला जवळचा वाटतो. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांनी बॅंकेचे कर्ज उचलून हा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सतत दुधाच्या दरात घट होत असल्याने सध्या तरी या व्यवसायाला उतरती कळा लागली की काय असे म्हणण्याची वेळ व्यवसायिक लोकांवर आली आहे. बाजारात गोळीपेंड, भूसा, आंबवनाचे दर वाढले असताना दुधाच्या दरात वाढ होण्याऐवजी घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रतिलिटरला 26 ते 27 रुपये मिळणारा दर सध्या घसरत 19 ते 20 रुपयावर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकास आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन दूध व्यवसायिक मंडळींनी रोष व्यक्त केला. शेतीमालाला भाव नाही दुधाला बाजार नाही, अशा स्थितीत शासनाने दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्‍यकता आहे. परंतु शासनस्तरावर असा कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वास्तविक दुग्धविकास मंत्री महादेव जानकर ग्रामीण भागातील असून शेतकरी बांधवाच्या व्यथा त्यांना माहित आहेत. दुग्धखाते योगायोगाने त्यांच्याकडे असल्याने बाजारभावाच्या बाबतीत त्यांनी ठोस निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे, असे न झाल्यास पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विद्यमान शासनाला याचा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)