#विशेष : हवामान बदल आणि उपासमारी (भाग 1)

-राजीव मुळ्ये (पर्यावरण अभ्यासक)

अर्धपोटी आणि उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकाच वर्षात हा आकडा दोन कोटींनी वाढणे मानवजातीला शोभणारे नाही. वातावरणीय बदलांमुळे झालेले परिणाम, शेतीची होत असलेली वाताहत हे अन्नटंचाईचे प्रमुख कारण ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना न केल्यास जलवायू परिवर्तनाशी अनुकूलन साधणे उत्तरोत्तर कठीण होत जाईल आणि उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या अशीच वाढत जाईल.

जागतिक तापमानवाढीमुळे अनेक समस्या उद्‌भवत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही; परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या एका अहवालानुसार, पर्यावरणातील बदलांमुळे भीषण अन्नटंचाई जगात निर्माण होत असून, त्यामुळे लाखो लोकांना भुकेचा सामना करावा लागत आहे. या अहवालानुसार, जगभरात नऊमधील एका व्यक्तीला पुरेसे भोजन मिळत नाही. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या वैश्‍विक अन्नसुरक्षा अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी अन्नधान्याच्या कमतरतेची झळ जगभरातील 82.1 टक्के लोकांना बसली आणि 2015 नंतर अन्नटंचाईच्या दृष्टीने हे सर्वांत भीषण वर्ष होते.

जगातील ज्या देशांना अन्नटंचाईची समस्या तीव्रतेने भोगावी लागते आहे, त्यात आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांचा सर्वाधिक समावेश आहे. या अहवालात केवळ गेल्या वर्षाचीच आकडेवारी समाविष्ट करण्यात आली आहे; परंतु तज्ज्ञांचे मत असे आहे की, सध्याची परिस्थिती यापेक्षा बिकट असण्याची शक्‍यता आहे. कारण 2018 मध्ये हवामानात झालेल्या परिवर्तनांचा समावेश सर्वेक्षणात करण्यात आलेला नाही. या परिवर्तनामुळे जगातील काही ठिकाणच्या शेतीवर गंभीर परिणाम होणार आहे. कारण पाऊस, वादळे गारपिटीसारख्या संकटांनी जगभरात थैमान घातले आहे. ही नैसर्गिक कारणे तर आहेतच; परंतु याव्यतिरिक्त जगातील अनेक देशांमध्ये युद्धे, हिंसाचार आणि संघर्षांमुळेही लोकांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे.

अहवालानुसार, जगाच्या ज्या भागांत पर्यावरणीय बदलांचा परिणाम दिसून येत आहे, अशा भागांत अन्नटंचाईचे संकट अधिक आहे. संशोधकांचे म्हणणे असे आहे की, गेल्या काही वर्षांत जगाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचे संकट तीव्र झाले आहे. याखेरीज पावसाचे बदलते स्वरूप शेतीला नुकसानदायक ठरत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बदलत्या हवामानामुळे तांदूळ, गहू आणि मकाच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वांत वाईट बाब म्हणजे अन्नटंचाईचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे.

जगाच्या अनेक भागांमध्ये संघर्ष, युद्धे आणि हिंसाचार ही अन्नटंचाईची कारणे ठरली असली, तरी मातीचा पोत बिघडणे, जैवविविधता घटणे या कारणांमुळे पिकांची उगवणक्षमता कमी झाली आहे, हे वास्तव स्वीकारायला हवे. जगाच्या एकंदर लोकसंख्येचा विचार करता आशिया खंडात भूकबळींची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचा क्रमांक लागतो. पर्यावरणीय परिवर्तनाचा सर्वाधिक परिणाम गरीब देशांना भोगावा लागत आहे; कारण कृषी उत्पादकता घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे या देशांमधील शेती पाण्यासाठी पावसावर अवलंबून आहे. परंतु दुष्काळ, तापमानात झालेली वाढ किंवा पूरपरिस्थितीमुळे या देशांमधील पिके पूर्णपणे नष्ट होत असल्यामुळे गरीब देशांना सर्वाधिक तडाखा बसला आहे.

जागतिक आकडेवारीचा विचार करता, 2016 मध्ये अन्नाच्या टंचाईने ग्रासलेल्या लोकांची संख्या 80 कोटी 40 लाख होती, ती 2017 मध्ये दोन कोटींनी वाढून 82 कोटी 1 लाख इतकी झाली आहे. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 2015 नंतर अन्नसंकट दरवर्षी अधिकाधिक तीव्र होत असल्याचे आकडेवारी सांगते. अन्नाच्या असुरक्षिततेमुळे जगात स्थूलतेची समस्या वाढत आहे; कारण उपाशीपोटी व्यक्ती नेहमी तणावग्रस्त असते. संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, अन्न आणि शेती संघटना, इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेन्ट आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम या संघटनांकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अन्नसंकट सातत्याने वाढत असल्याचे संशोधनकर्त्यांना दिसून आले आहे.

अशा स्थितीत लोकांना भुकेपासून वाचविण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना केल्या जाणे गरजेचे बनले आहे. अन्यथा सन 2030 पर्यंत अन्न असुरक्षितता शून्य करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट गाठणे अशक्‍य आहे. या अहवालातून असेही दिसून आले आहे की, लोकांना केवळ अन्न मिळणे एवढीच गरज नसून, त्या अन्नाच्या दर्जाबाबतही तडजोड करणे चुकीचे ठरेल. निकृष्ट अन्नामुळेही भयावह दुष्परिणाम होऊ शकतात. पैसा वाचविण्यासाठी एक वेळच जेवण घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले असून, त्यामुळेही लोकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

#विशेष : हवामान बदल आणि उपासमारी (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)