#स्पर्श – व्यक्त होताना

-अमोल भालेराव

पावसाळ्याचे दिवस होते. रविवार सुट्टीचा दिवस. संध्याकाळच्या वेळेत गॅलरीत बसून मस्त गरमागरम चहा घेत होतो. सहज गॅलरीतून खाली नजर गेली. कुत्र्याची – छोटी पिल्लं खेळता खेळता अचानक त्यांच्या आईजवळ गेली आणि एकदम कुशीत शिरू लागली. त्यातील एक पिल्लू आपल्या आईच्या तोंडाला पायाने स्पर्श करू लागले. तिने त्या पिलाला आपल्या कुशीत अधिकच जवळ केले, जणू त्या पिलाच्या स्पर्शाचा अर्थ तिला कळला होता. हे पाहात असताना सहज मनात एक विचार स्पर्श करून गेला. प्राणीदेखील आपल्यासारखाच सजीव. फरक एवढाच की, त्याला बोलता येत नाही. त्या पिलांना आणि त्यांच्या आईला जे व्यक्त व्हायचं असेल; ते व्यक्त झाले. पण फक्त स्पर्शानेच…!

पृथ्वीतलावर मनुष्य हाच एकमेव असा आहे, जो त्याच्या भावना एक किंवा अधिक माध्यमातून व्यक्त करू शकतो. कधी कोणाशी बोलून, कधी लिहून, तर कधी अगदीच न बोलतादेखील. मनुष्य सतत त्याच्या भावना, त्याच्यातील क्षमता या इतरांपुढे व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो. इतर सजीवांच्या तुलनेत मनुष्यस्वभावाचे बरेच पैलू आहेत. आनंद, राग, लोभ, दुःख, क्रोध अशा कितीतरी भावनांनी मनुष्याच मन व्यापून गेलेलं असत.

या भावना तो समोरच्याकडे प्रकट करतो, तो व्यक्त होतो, तो आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी. आनंद व्यक्त करताना तो कधी हसतो, कधी समोरच्याला घट्ट मिठी मारतो, तर कधी त्याच्याबरोबर मनसोक्त नाचतो…! हाच मनुष्य जेव्हा दुःखात असेल तेव्हा तो आपल्या जवळच्या माणसाकडे आपल्या अश्रूंचा बांध फोडतो. तो सहजासहजी कोणापुढेही व्यक्त नाही होत. त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद, त्याच्या दुःखात आपले दुःख मानणाऱ्याकडेच तो आपल्या मनातील भावविश्‍व घेऊन उभा असतो. कारण त्याला माहिती असतं की, त्याच्या व्यक्त होण्याने त्याचे कुटुंब आणि पर्यायाने समाजावर परिणाम होणार आहे.

पण प्रत्येक भाव व्यक्त करता येईलच असे पण नाही. उदासीनता, कारुण्य, जिव्हाळा, आपुलकी, या गोष्टी सहजासहजी नाही व्यक्त करता येत. एखाद्याच्या चेहऱ्यावर हेच भाव उमटतात. त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला ते भाव लपविता नाही येत. त्याची आतल्या आत घुसमट होत असते. द्वंद्व चालू असते, दोन मनामध्ये. एक त्याला हे भाव बोलून दाखवायला सांगत असते, तर दुसरे त्याला हे करण्यापासून रोखत असते. कदाचित त्याच्या व्यक्त होण्याने समोरच्याला त्रास होऊ नये या विचाराने…!

पण खरं सांगू का, भावनाशून्य होऊन जगण्यात काय अर्थ आहे ? भावना मुळी असतातच व्यक्त करण्यासाठी. जो आपल्या भावनांना समजून घेऊ शकतो, आपल्या भावनांचा आदर करतो, तुमच्या आत चाललेली तगमग त्याला जाणवते त्याच्यापुढे व्यक्त व्हायला काय हरकत आहे?

जर प्राणी स्पर्शाने व्यक्त होऊ शकतात, तर आपण एकमेकांशी बोलून, एकमेकांच्या मनाला स्पर्श करून नाही का व्यक्त होऊ शकत. नाहीतर मरणशय्येवर पडलेल्या आपल्या वडिलांच्या थरथत्या हाताकडे पाहून असे नको वाटायला की, कमीतकमी आयुष्यात एकदा तरी प्रेमाने वडिलांना स्पर्श करायला हवा होता. त्यांना व्यक्त व्हायला एक हक्काचं माणूस त्यांच्यासाठी आहे हे त्यांना………!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)