#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 2)

-अभय पटवर्धन (लेखक निवृत्त कर्नल आहेत)

दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दुसरा वर्धापन दिन दणक्‍यात साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. संरक्षण दलांचा सहभाग असलेल्या या आयोजनांद्वारे मोदी सरकार आपली दृढ राजकीय इच्छाशक्ती व खंबीरता दाखवू इच्छिते, अशी चर्चा आहे. पण केवळ भपकेदार आयोजनांनी वीर शहिदांना अभिवादन होत नसते. आदरांजली वाहिली जात नसते. त्यासाठी दूरदृष्टी व सजग धोरणांतर्गत त्यांच्यासाठीच्या संसाधनांमधील उणिवा दूर करण्याची कार्यक्षमताही अंगी बाणवावी लागते. ती न करता केवळ एकदाच केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वत्र एवढे भव्य आयोजन करणे हे असमर्थनीय, असंबद्ध, अप्रासंगिक, अप्रायोजित आणि अव्यावहारिक आहे.

विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्जिकल स्ट्राईकला आपले समर्थन दर्शवण्यासाठी पत्रे व ग्रीटिंग कार्डस्‌ पाठवायला सांगावे असे आदेश युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने कुलपतींना दिले आहेत. हेच आदेश सेंट्रल एज्युकेशन मिनिस्ट्रीने राज्यांच्या एज्युकेशन मिनिस्ट्रीज्‌, एज्युकेशन ऑफिसर्स आणि शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत. माहिती आणि प्रसारण खात्याने सर्जिकल स्ट्राईकप्रती लोकांच्या मनात ऊर्जा व देशभक्ती प्रज्वलित करणारे गीत लिहिण्याची जबाबदारी प्रख्यत सिने लेखक व कवी प्रसुन जोशीला आणि रेडियो जॉकींच्या माध्यमातून आम जनतेच्या मनावर सर्जिकल स्ट्राईकची महत्ता बिंबवण्याची जबाबदारी एफएम चॅनेल्सना दिली आहे. याखेरीज देशभरातील एनसीसी युनिटच्या “स्पेशल परेडस्‌’ या दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र सर्व विरोधी पक्ष, खास करून कॉंग्रेसने ” या आदेशांद्वारे सरकार आर्मीचे राजकीय परिवर्तन करत आहे आणि आम्ही त्याचा धिक्‍कार करतो’ अशा आरोळ्या ठोकत गहजब सुरू केला आहे. सर्जिल स्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन जरी साजरा केला नसला तरी दुसऱ्या वर्धापन दिन साजरा करण्याच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या या तीन दिवसीय आयोजनांद्वारे मोदी सरकार काय दर्शवूू व साध्य करु इच्छिते असा प्रश्‍न उभा ठाकतो.

-Ads-

अ) हे आयोजन युद्धातील विजयाची आठवण साजरी करण्यासाठी केले गेलेले नाही. कारण या ऑपरेशनमध्ये कोणाचाच विजय झाला नाही. मात्र हा सर्जिकल स्ट्राईक युद्धात विजय मिळवण्यासाठी नसला तरी शत्रूला धडा शिकवण्यासाठी केला होता आणि त्यामध्ये पाकिस्तानचे जानी, माली व सामरिक नुकसान होऊन त्यांचे मनोबल मोठ्या प्रमाणात खच्ची झाले आहे यात शंकाच नाही. ब) हे आयोजन वीर शहिद सैनिकांना देण्यात येणारा मान आणि समर्थनाचे प्रतीकही नाही; कारण तसे कुठलेही कलम याच्या कार्यप्रणालीत नाही,आणि क) संरक्षण दलांचा सहभाग असलेल्या या आयोजनांद्वारे मोदी सरकार आपली दृढ राजकीय इच्छाशक्ती व खंबीरता दाखवू इच्छिते.

पहिले दोन्ही पर्याय या सेलीब्रेशनच्या आयामात येत नसतांना तिसऱ्या पर्यायानुसार हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असेल तर या आयोजनाच्या माध्यमातून सरकार संरक्षण दलांचा वापर आपल्या निहीत राजकीय उद्देशांसाठी एखाद्या प्याद्यासारखा करुन घेत आहे असा विचार कोणाच्या मनात आला तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही किंवा यात वावगेही काहीच नाही. ही शंका ग्राह्य धरली तर हे सरकारचे संरक्षण दलांच्या मुलभूत सिद्धांतांची धज्जी उडवले जाणारे, सर्वात घातकी आणि अपकर्षकारक पाऊल असेल. कारण आगामी सरकारांनी याच पायंड्यांची री ओढली तर यापुढे सैनिक लढण्याऐवजी अशाच ऐहिक व सामान्य कामात कार्यक्रमांमध्ये मश्‍गुल होतील. केवळ अशा आयोजनांद्वारे आपल्या सैनिकांचा सन्मान होत नाही आणि होऊ शकत नाही. सैनिकांचे लढाईतील शौर्य आणि वीरकृत्यांसाठी त्यांचा सन्मान करणे, आदर व्यक्त करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

“ऑपरेशन कॅक्‍टस लिली’अंतर्गत 1971च्या तिसऱ्या भारत पाक युद्धातील साफल्यप्रीत्यर्थ 16 डिसेंबरला साजरा होणारा “विजय दिवस’ किंवा “ऑपरेशन विजय’ अंतर्गत 1999च्या चौथ्या भारत पाक युध्दातील विजयासाठी 26 जुलैला साजरा होणारा “कारगिल विजय दिवस’ हे याचेच उदाहरण आहे. आम जनतेला आपल्या सैनिकांनी केलेल्या प्राणार्पणांची जाणीव करुन देण्यासाठी त्याच प्रमाणे सैनिकांचे मनोबल वृध्दिंगत करण्यासाठी अशा आयोजनांचा उपयोग होतो यात शंकाच नाही.

#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 1)    #चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 3) 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)