#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 3)

-अभय पटवर्धन (लेखक निवृत्त कर्नल आहेत)

दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दुसरा वर्धापन दिन दणक्‍यात साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. संरक्षण दलांचा सहभाग असलेल्या या आयोजनांद्वारे मोदी सरकार आपली दृढ राजकीय इच्छाशक्ती व खंबीरता दाखवू इच्छिते, अशी चर्चा आहे. पण केवळ भपकेदार आयोजनांनी वीर शहिदांना अभिवादन होत नसते. आदरांजली वाहिली जात नसते. त्यासाठी दूरदृष्टी व सजग धोरणांतर्गत त्यांच्यासाठीच्या संसाधनांमधील उणिवा दूर करण्याची कार्यक्षमताही अंगी बाणवावी लागते. ती न करता केवळ एकदाच केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वत्र एवढे भव्य आयोजन करणे हे असमर्थनीय, असंबद्ध, अप्रासंगिक, अप्रायोजित आणि अव्यावहारिक आहे.

पण केवळ एकदाच केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वत्र एवढी भव्य आयोजन करणे हे असमर्थनीय, असंबद्ध, अप्रासंगिक, अप्रायोजित आणि अव्यावहारिक आहे. लढाईतील कृत्यांसाठी सैनिकाला आदर व सन्मान मिळायलाच पाहिजे. हा आदर व सन्मान केवळ एका आयोजनाद्वारे दिला जाऊ शकत नाही. प्रत्येक युनिट व फॉर्मेशनमध्ये त्यांचे स्वत:चे “बॅटल ऑनर डे’ किंवा रेझिंग डे सारखे पारंपरिक कार्यक्रम न चुकता आयोजित केले जातात. मात्र बॅटल ऑनर्ड, रेझिंग डे हे युनिटचे आपले स्वत:चे, कार्यरत निवृत्त सैनिक व त्यांची कुटुंबीय आणि शहिदांचे कुटुंबीय यांचा सहभाग असलेले खासगी आयोजन असते. त्यात आम जनतेची भागिदारी, सहकार्य वा त्यांचे प्रशिक्षण प्रायोजित नसल्यामुळे ते सार्वजनिक रित्या साजरे होत नसतात.

-Ads-

अशा अनावश्‍यक आयोजनांऐवजी सांप्रत सरकारने सत्तेवर येण्याआधी आणि आल्यानंतर दिलेल्या आश्‍वासनांनुसार
अ) स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्व युद्धे व त्यानंतरच्या सर्व इंसर्जन्सी ऑपरेशन्समध्ये धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे असलेले आणि परमवीर चक्र विजेत्या सैनिकांचे पुतळे असलेले भव्य वॉर मेमोरियल दिल्लीतील इंडिया गेट जवळ उभारावे. ब) ज्या राज्यांमध्ये युद्धे झालीत त्या ठिकाणांवर त्या चकमकी/युद्धास्मृत्यर्थ स्मारके उभारावीत जी खासकरुन शौर्याकर्षण असलेल्या विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारी सामरिक माहितीची केंद्रे बनतील.

वरील सर्व योजनांमुळे देशातील जनतेला व विदेशी पर्यटकांना आपल्या येथील पराक्रमी वीरांच्या कामगिरीबद्दल माहिती मिळेल. त्या शहिदांच्या स्मृतीला देशाने दिलेली ती मोठी मानवंदना असेल आणि दर्शवलेला आदर असेल आणि क) अशा प्रत्येक सैनिकाच्या नावासह त्याचे युनिट कोणते, सेनेत किती कारकिर्द झाली,जन्म केंव्हा झाला इत्यादी वैयक्तिक माहिती देणारी त्याच्या नावाची नामपट्टी, तो कुठे, केव्हा व कसा धारातीर्थी पडला आणि त्याला मिळालेल्या वीरता पुरस्कारच्या माहितीसह त्याच्या जन्मस्थानी, घराजवळील चौकात- घरासमोर लावाव्यात. खरे म्हणजे हेच कार्य आगामी सरकारांनी देखील पुढे रेटणे आवश्‍यक व अभिप्रेत आहे.

देशातील जनता व राज्यकर्त्यांप्रमाणेच प्रत्येक कार्यरत व निवृत्त सैनिकाला सर्जिकल स्ट्राईकबद्दल आदर व अभिमान वाटतो आणि तसाच तो निवृत्त सैनिक असलेल्या प्रस्तुत लेखकालाही वाटतो. लोकांमध्ये सेनेच्या कार्यांप्रती जागृकता आणण्यासाठी अशा कार्यक्रमांचा उपयोग होतच असतो. पण जर वीर शहिद सैनिकांप्रती आदरच अर्पण करायचा असेल तर अशा आयोजनांच्या आधी किंवा त्यांच्या साथीने किंवा ते संपन्न झाल्यावर, त्यांच्यासाठी वॉर मेमोरियल उभारुन दाखवा. त्यांच्या ओआरओपी व एनएफयूच्या कमतरता पूर्ण करुन दाखवा.

त्यांच्यासाठी बुलेटप्रूफ जॅकेटस्‌/स्वयंचलित अत्याधुनिक रायफल्स/नाईट व्हिजन डिव्हायसेस्‌, लढाऊ विमाने, जहाजे व मिसाइल्स खरेदी करुन दाखवा. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली सामरिक बंधने हटवून दाखवा. त्यांच्या रोजमर्रा कामातील सरकारी हस्तक्षेप हटवा. प्रशासकीय अधिकारी/राजनेते/सरकार आणि गाव पातळीवरील रेव्हेन्यु व पोलीस पाटलांना त्या वीरांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यास बाध्य करुन दाखवा. असे झाले तरच अशा कार्यक्रमांची बूज राखली जाईल. नाही तर हे देखील एक “पब्लिसिटी गिमिक’ आहे असा जनतेचा समज होईल.

केवळ भपकेदार आयोजनांनी वीर शहिदांना अभिवादन होत नसते. आदरांजली वाहिली जात नसते. त्यासाठी दूरदृष्टी व सजग धोरणांतर्गत त्यांच्यासाठीच्या संसाधनांमधील उणिवा दूर करण्याची कार्यक्षमताही अंगी बाणवावी लागते.

#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 1)   #चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 2) 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)