#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 1)

-अभय पटवर्धन  (लेखक निवृत्त कर्नल आहेत)

दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दुसरा वर्धापन दिन दणक्‍यात साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. संरक्षण दलांचा सहभाग असलेल्या या आयोजनांद्वारे मोदी सरकार आपली दृढ राजकीय इच्छाशक्ती व खंबीरता दाखवू इच्छिते, अशी चर्चा आहे. पण केवळ भपकेदार आयोजनांनी वीर शहिदांना अभिवादन होत नसते. आदरांजली वाहिली जात नसते. त्यासाठी दूरदृष्टी व सजग धोरणांतर्गत त्यांच्यासाठीच्या संसाधनांमधील उणिवा दूर करण्याची कार्यक्षमताही अंगी बाणवावी लागते. ती न करता केवळ एकदाच केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वत्र एवढे भव्य आयोजन करणे हे असमर्थनीय, असंबद्ध, अप्रासंगिक, अप्रायोजित आणि अव्यावहारिक आहे.

दोन वर्षांपूर्वी 17-18 सप्टेंबर 2016च्या रात्री काश्‍मीरच्या उरीजवळ असलेल्या सेनेच्या कॅम्पवर पाकिस्तानमधून सीमापार आलेल्या जिहादी दहशतवाद्यांनी मागील दोन दशकांतील सर्वांत मोठा आणि घातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे 17 जवान शहीद झाले आणि 19 सैनिक जखमी झाले होते. यानंतर 11 दिवसांनी 28-29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सेनेच्या स्पेशल फोर्सेसने पाकिस्तान ऑक्‍युपाईड काश्‍मिरमधील जिहादी लॉंचपॅडस्‌वर नेमका हल्ला (प्रिसिजन स्ट्राईक) करुन अंदाजे 46 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याच दिवशी दुपारी तत्कालीन डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनन्ट जनरल (सांप्रत आर्मी कमांडर नॉर्दर्न कमांड ) रणबीर सिंग एव्हीएसएम. वायएसएम. एसएम. यांनी एका पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या घटनेनंतर सर्व देशभरात आनंद व अभिमानाची त्सुनामी आली. सुरुवातीला सर्वच विरोधी पक्षांनी सरकारी निर्णयाची प्रशंसा केली; पण दोन आठवड्यांनंतर कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष या राजकीय पक्षांनी या ऑपरेशनविषयी शंका उपस्थित केली. तसेच पुराव्यादाखल या ऑपरेशनचे व्हिडिओज सार्वजनिक करण्याची मागणी केली. “मोदी सरकार याचा राजकीय फायदा उचलते आहे’ असा नारा विरोधकांनी लावला; तर मोदी सरकारने सेनेद्वारा केल्या गेलेल्या या स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांचे वाभाडे काढले.

-Ads-

जून,2018मधे सरकारने या सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडियोज्‌ सार्वजनिक केले. जिहादी लॉंचपॅडस्‌ नष्ट करण्यासाठी सैनिकांनी केलेला गोळीबार, बंकर्सवरील बॉंबिंग, ग्रेनेड फायरिंग आणि कंठस्नान घातलेल्या काही जिहाद्यांची शेवटची दृष्ये या व्हिडिओंमध्ये दाखवण्यात आली. “मोदी सरकार सैनिकांचे शौर्य व प्राणापर्णाचे राजकीय श्रेय घेते आहे’ असा आरोप विरोधकांनी परत एकदा केला असता सरकारने “आधी पुरावे दाखवा म्हणून ओरडत होते आणि दाखवल्यावर हे प्रसिद्धीसाठी करण्यात येत आहे’ असे म्हणतात; काय म्हणायचे आहे ते नक्‍की ठरवा’ अशा शब्दांमध्ये त्यांची खिल्ली उडवली. पाकिस्तानने सुरवातीपासूनच असा स्ट्राईक झाल्याचे नाकारले आणि हे विदुषकी (फार्सिकल) बोलणे आहे असा टोला मारला.

आता 28 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान ” मार्किंग द सेकंड ऍनिव्हर्सरी ऑफ सर्जिकल स्ट्राईक’ या नावाने या कारवाईचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. प्रमुख कार्यक्रम दिल्लीतील इंडिया गेटच्या हिरवळीवर होणार असला तरी देशातील सर्व लहान मोठ्या शहरांमध्ये देखील हा दिवस साजरा करण्यात येईल.
अ) प्रत्यक्ष स्ट्राईकचे आणि त्याच्या संबंधित इतर कारवायांचे व्हिडियोज्‌ ही दाखवण्यात येतील ब) संरक्षण दलांच्या तीनही दलांची हत्यारे, सामान, सामुग्री व संसाधनांना तेथील स्टॉल्समध्ये ठेवले जाईल/ठेवण्यात येईल. क) स्थलसेनेचे, सीमापार करुन पाकिस्तान व इतर शत्रू राष्टांवर हल्ला करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात येईल. ड) संरक्षण दलांमधील समन्वय आणि एकोप्यामुळे निर्माण होणाऱ्या शौर्याला (व्हॅलर) उजागर केल्या जाईल आणि इ) देशात संरक्षण दलांची गरीमा वृद्धिंगत करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.

याशिवाय,निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची व्याख्याने आणि “पॅनेल डिसकशन्स’ ही आयोजित केली जातील. देशातील इतर शहरांमधे देखील मोठ्या प्रमाणावर असे कार्यक्रम आयोजित करण्याचा सरकारचा मानस आहे. तीन दिवस सर्वत्र होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी होणारा संसाधन खर्चाचा विचार करता देशभरातील एकूण खर्च अंदाजे 15 हजार कोटी रुपयांच्या आसपास होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

#चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 2)   #चर्चेत : पब्लिसिटी गिमिक की…? (भाग 3) 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)