नायिका आणि ‘खाकी’ (भाग 2)

अलीकडील काळात पोलीस दलामध्ये महिलांचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी हिंदी चित्रपटांमध्ये खाकी वर्दीतील नायिका तशी अभावानेच दिसली. त्यातही साचेबद्धपणा अधिक दिसून आला. नायक पोलीस अधिकाऱ्याची जशी भूमिका होती तशीच ती अभिनेत्रींनाही मिळाली. महिला पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या आय़ुष्यात ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांना कोणत्या वातावरणात काम करावे लागते, कामाच्या वेळेत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे कोणत्याच चित्रपटात गांभीर्याने दाखवले गेले नाही.

महिला पोलीस अधिकारी दाखवण्यामध्ये काही वेगळा विचार केला गेला नाही. केवळ नायिकांची रडकी, पीडित, शोषित स्रीची इमेज तोडण्यासाठी तिला शूर, कर्तबगार दाखवण्याचा सिलसिला सुरू झाला. 10-20 गुंडांना मारणारी अभिनेत्री प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरेल, असा विचार ठेवून तिला “खाकी’मध्ये बसवण्यात आले. असे असूनही नायकांप्रमाणेच नायिकांनी संधी मिळेल तेव्हा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करण्यास पाय मागे टाकले नाहीत. तरीही विश्‍वसनीयता आणि नैसर्गिकपणा त्यांच्या वाट्याला कमीच आली.

अभिनेत्रींना पुरुषी दाखवण्याचा प्रयत्न या आधीही झाला आहे. अगदी मूक चित्रपटांच्या काळात स्टंट क्‍वीन आणि हंटरवालीच्या रूपात फिअरलेस नादिया जेव्हा आश्‍चर्यकारक रितीने गुंडांना मारहाण करत असे तेव्हा लोकांना आश्‍चर्य वाटत असे. सुरुवातीला दुर्गा खोटे यांनीही “राजपुतानी’ सारख्या चित्रपटामध्ये साहसी भूमिका साकारली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्वयंसिद्धा’ “दुनिया ना माने’ सारख्या काही चित्रपटात नायिकांनी अन्यायाचा विरोध केला. मात्र आपल्या मर्यादेत राहून. अभिनेत्रींचे स्वाभिमानी, आत्मविश्‍वासपूर्ण रुपही अनेक चित्रपटांतून दिसले आहे. पण त्यांना महानायकाप्रमाणे महानायिका दाखवण्याची सुरुवात 80 च्या दशकात झाली. “शोले’ हा चित्रपटांमधील हिंसा आणि प्रतिहिंसा यांचे एक व्यासपीठ होता. यामध्ये नायिकेचा चेहराही बदलला आणि तिला खाकी गणवेश घालून ऍक्‍शन क्‍वीनही बनवण्यात आले.

बारीक अंगकाठी असणाऱ्या नाजूक अभिनेत्रीचे बदललेले रुप अनेक चित्रपटांमध्ये हास्यास्पदही वाटले. “जवाब हम देंगे’ मध्ये श्रीदेवी, “खलनायक’मध्ये माधुरी दीक्षित आणि “अंधा कानून’, “फर्ज और कानून’ मध्ये हेमा मालिनी देखील अशाच परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.

काही बाबतीत पटकथेतही कमतरता होती तर काही  भूमिका कल्पनाहीन चित्रणामुळे वाया गेल्या. यासाठी “आग’ आणि “दो दुनी चार’ या दोन चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. “आग’ मध्ये शिल्पा शेट्टी आणि “दो दुनी चार’ मध्ये जुही चावला पोलीस अधिकारी होती. दोघींना खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आपली ओळख लपवण्यासाठी जे काही करावे लागले त्यात खोटेपणा, नाटकच अधिक जाणवले. या तुलनेत “दस’मध्ये शिल्पा शेट्टी, “डॉन’च्या सिरीजमधील दोन्ही चित्रपटांमध्ये प्रियांका चोप्रा अंडर कव्हर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. या भूमिका थोड्या वास्तववादी होत्या असे म्हणावे लागेल.

नायिका आणि खाकी (भाग 1)     नायिका आणि खाकी (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)