नायिका आणि ‘खाकी’ (भाग 1)

अलीकडील काळात पोलीस दलामध्ये महिलांचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी हिंदी चित्रपटांमध्ये खाकी वर्दीतील नायिका तशी अभावानेच दिसली. त्यातही साचेबद्धपणा अधिक दिसून आला. नायक पोलीस अधिकाऱ्याची जशी भूमिका होती तशीच ती अभिनेत्रींनाही मिळाली. महिला पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या आय़ुष्यात ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांना कोणत्या वातावरणात काम करावे लागते, कामाच्या वेळेत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे कोणत्याच चित्रपटात गांभीर्याने दाखवले गेले नाही.

परदेशात जास्त आणि भारतात कमी दर्शन देणाऱ्या प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीसाठी “जय गंगाजल’ या चित्रपटातील भूमिका एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकली असती. चित्रपटात तिने भ्रष्ट व्यवस्थेचा मुकाबला करणाऱ्या दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. 13 वर्षांपूर्वी “गंगाजल’ नावाच्या चित्रपटात अजय देवगणने ज्या प्रकारे राजकीय दबावशाहीचा सामना केला होता त्याच प्रकारचा सामना पोलीस अधिकाऱ्यांच्या रुपात प्रियांका चोप्राने केला होता.

या चित्रपटातील तिच्या हाणामारीच्या दृश्‍यांमध्ये फार सहजता दिसली नाही. मात्र, तणावाच्या प्रसंगातही तिने गांभीर्याने स्वतःला व्यक्त केले. अर्थात, बांधीव पटकथा आणि प्रकाश झा यांचे कुशल दिग्दर्शन याचीही साथ या चित्रपटाला मिळाली. पण गतवेळच्या चित्रपटाइतके यश या वेळच्या चित्रपटाला लाभले नाही. तथापि, या निमित्ताने खाकीतील नायिकांची चर्चा नव्याने सुरू झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी जेव्हा चित्रपटांतील अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दाखवली जायची तेव्हा महिला अधिकारी बाहुबलीप्रमाणे हवेत उडत गुंडांना मारत असल्याचे दाखवले जायचे किंवा भ्रष्ट राजकीय नेत्याची खुलेआम हत्या करणे हेच तिचे ध्येय असल्याचे दर्शवले जात होते. “जय गंगाजल’ मध्ये प्रियांका आणि “मर्दानी’ मध्ये राणी मुखर्जीने हा पायंडा तोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे खाकी वर्दीतील नायिका हा फॉर्म्युला चालत नाही, अशी धारणा वाढीस लागली.

बहुतांश वेळा अभिनेत्यालाच खाकी गणवेशात दाखवले जाण्याची परंपरा चित्रपटांमध्ये आहे. त्याव्यतिरिक्‍त कोणतेही वेगळे रंग या फिल्मी व्यक्‍तिमत्चाचे असू शकत नाहीत. मूळ गोष्ट समजून न घेता नायकाने खाकी गणवेश घातला असेल तर त्याला सुपरमॅन दाखवण्याची पद्धत चित्रपटांमध्ये रूढ होती. परिणामी अपवादात्मक काही चित्रपट वगळता हिंदीच नव्हे तर एकंदरीतच भारतीय चित्रपटांमध्ये ढासळत्या पोलीस व्यवस्थेच्या समस्या ओळखण्याचा प्रयत्न केला गेला नाही.

वास्तविक पोलिसांची मनःस्थिती, मानसिकता आणि त्यांना कसे शस्त्र म्हणून वापरले जाते याचा गंभीरपणे विचार कऱण्याचा प्रयत्न चित्रपटांतून झाला नाही. ग्लॅमरस, सौंदर्यवती, शालीन, मुक्‍त विचारांची, मॉडर्न या रूपात रूपेरी पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या नायिकेने खाकी गणवेश घालण्यास सुरुवात केली तेव्हाही त्यांना वेगळी नवी ओळख देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाहीत. नायक पोलीस अधिकाऱ्याची जशी भूमिका होती तशीच ती अभिनेत्रींनाही मिळाली.

नायिका आणि खाकी (भाग 2)   नायिका आणि खाकी (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)