#जिव्हाळा : आपले आयुष्य-आपले जगणे 

-अमोल भालेराव

“घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती…”
अशी विमल वाणी यांची एक कविता आहे. फारच छान आहे ही कविता. फ्रेम करून घरात लावावी अशी, आयुष्याचा अर्थ शिकवणारी आणि आयुष्य म्हणजे तरी काय? आयुष्य म्हणजे माणसाला पडलेले जणू एक गोड स्वप्नच. आणि या स्वप्नात आपण एकटे तर मुळीच नसतो.

आपल्याबरोबरच इतर पात्रंही असतात. आपल्या घरात राहणारी, आपलीच जिव्हाळ्याची माणसं असतात. आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मावशी…..अशी रक्ताची बरीच नाती असतात आणि या नात्याचा वटवृक्ष ज्यांनी उभा केला, असे आपले आजी-आजोबा…!

घर म्हंटलं की डोळ्यासमोर उभं राहत ते चार भिंतींचं घरटं. या घरट्यात पूर्वीदेखील माणसंच राहायची आणि आजही माणसंच राहतात. पण त्यावेळेच्या माणसांत आणि आजच्या माणसांत पुष्कळ फरक आहे. पूर्वी कसे घरटे गजबजल्यासारखं वाटायचं. आई-वडिलांबरोबरच आजी-आजोबाचंही प्रेम मिळायचं. पूर्वी याच घरट्यात एका आरामदायी खुर्चीत बसून आजोबा आपल्या नातवंडाना गोष्टी सांगायचे. रात्री जेवायला कशी जोरदार पंगत बसायची. आणि झोपायचं म्हंटल तर आजीच्या जुन्या साडीपासून तयार केलेली उबदार गोधडी असायची.

सण-उत्सवात मामा, काका, मावशी, आत्या, त्यांची मुलंबाळं….. सर्वजण एकत्र येऊन अगदी धम्माल करायचे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी व्हायची. आजीच्या हाताने केलेले लाडू खाताना ते खूप गोड़ लागायचे, कारण त्यात आजीने तिचा जीव ओतलेला असायचा…!एकमेकांच्या सुखदुःखात कोणी आवाज द्यायच्या आतच सर्वजण धावून यायचे. त्यावेळेस पैशापेक्षाही अनमोल होती ती म्हणजे जिव्हाळ्याची नाती..!

आणि आज ? घर तर आहे, परंतु घरात राहायला माणसं नाहीत. घरात किलबिलाट म्हणाल तर मुळीच नाही, जणू घर नसून एखादी स्मशानभूमीच. आरामखुर्ची तर आहे पण त्या खुर्चीला ज्यांच्यामुळे शोभा यायची ते आजोबा मात्र नाहीत. आणि महागड्या ब्लॅंकेटला आजीच्या उबदार साडीपासून केलेल्या गोधडीची सर कुठून येणार ?

आजकाल ऋतू बदलतात तशी नाती बदलतात. नात्यातील ओलावा अगदीच सुकून गेला आहे. आज नात्यापेक्षा पैसा श्रेष्ठ झाला आहे. आज हाच माणूस क्षणभंगुर सुखासाठी धडपड करत आहे आणि कळत नकळत एकाच क्षणात नात्यापासून, जवळच्या माणसांपासून दुरावत आहे. आज हाच माणूस आपले आई-वडील जिवंत असतानाच, त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची योजना आखत आहे. भाऊ-बहिणी परस्परांतील प्रेम एकमेकांना वाटून वाढवत बसण्यापेक्षाही घराच्याच वाटण्या करण्यासाठी उफाळून येताना दिसत आहे. आज्क सर्वत्र भ्रामक स्पर्धा वाढली आहे. दिखावा, बडेजावपणा दाखवायचा तोही आपल्याच माणसांना.

आयुष्य कधी संपेल, हे तर कोणालाच माहिती नाही. जर मग याच आयुष्यात स्वार्थ थोडा बाजूला ठेवला, आणि एकमेकांबद्दल कधी तरीचा असलेला मनातील राग गिळून टाकला….नात्यांतील गोडवा आणि ओढ वाढत राहील. जर आपली नाती जपत आणि एकमेकांच्या भावना सांभाळत हे आयुष्य जगता आले तर..? ही गोष्ट काही कठीण नाही, अशक्‍य तर मुळीच नाही. फक्त तसे सतत वाटत राहिले पाहिजे. तसे झाले ना, तर खरंच हे स्वप्नरूपी गोड़ आयुष्य कधी संपूच नये, असे वाटू लागेल.

वैज्ञानिक संशोधनातून हे समोर आले आहे की माणूस जेव्हा मरणाच्या दारात उभा असतो तेव्हा त्याने आयुष्यात किती संपत्ती कमावली याचा हिशेब तो नाही करत. आयुष्यात आपण किती माणसं कमावली, किती नाती जपली, किती प्रेम दिले नि घेतले याची तो गोळाबेरीज करीत असतो. त्याच मरणाच्या दारात तो स्वतःला कोसतो देखील, कारण अहंकार, स्वार्थ, कटुता यामुळे त्याने जवळच्या नात्यांना दुखावलेले असते आणि कायमचे दुरावलेले देखील. मरतानाही सर्वाना डोळे भरून पाहता आले आणि त्याच क्षणी सर्वांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी तरळलं तरच समजा कि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं आयुष्य जगलात…!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)