#स्मरण : सुवर्णकन्या स्वप्ना बर्मन… एका जिद्दीची कहाणी

-योगिता जगदाळे

इंडोनेशियातील जकार्ता येथे नुकतीच आशियाई स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारताने विक्रमी कामगिरी केली. सुवर्णपदके भारताला मिळाली. त्यापैकी एक सुवर्णपदक मिळाले स्वप्ना बर्मन या ऍथलेटला. हॅप्थेथलॉन स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या क्रीडाप्रकारातील भारताचे हे पहिलेचे सुवर्णपदक.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वप्ना बर्मनने ही कामगिरी केली आहे. स्वप्नाने सुवर्णपदक मिळवले त्या क्षणाच्या तिच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अगदी पुन्हा पुन्हा पाहावा असा व्हिडियो आहे. एक पत्र्याची खोली. साधा टीव्ही आणि त्यावर स्पर्धा पाहणारे स्वप्नाचे कुटुंबीय.

त्या सर्वांच्या प्रतिक्रिया अगदी पाहण्यसारख्या-खास करून तिच्या आईच्या. अगदी गरीब कुटुंबाचे चित्र आहे ते. स्वप्ना जिंकत जाते, तसे तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. तिचे काळीज भरून येते, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि स्वप्ना जिंकल्यानंतर तर तिला अनावर होते. अगदी काळीज पिळवटून जावे असे हुंदके देत ती टीव्हासमोरून उठते आणि रडत रडतच मागे असलेल्या छोट्या मंदिरातील देवीसमोर जाते. तिथे साष्टांग लोटांगण घालून आपल्या भावना मुक्‍त करते. असे प्रकार फार क्वचितच पाहायला मिळतात. अशा नैसर्गिक भावनांचा उद्रेक पाहायला मिळत नाही. बहुदा अशा वेळी तोलून मापून तयारी केलेली उत्तरे आणि प्रतिक्रिया पाहायला ऐकायला मिळतात.

स्वप्नाच्या आईला स्वप्नाने केलेली मेहनत आठवली असेल, तिने केलेले कष्ट भोगलेला त्रास आठवला असेल. म्हणून असा ऊर फुटेपर्यंत आनंद तिला झाला असावा. 29 ऑक्‍टोबर 1996 रोजी जन्मलेली स्वप्ना बर्मन एक गरीब कुटुंबातून आलेली आहेच. वडील रिक्षा चालक. गेली काही वर्षे आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले. आई चहाच्या मळ्यात कामगार. हे कमी की काय, स्वप्नाच्या दोन्ही पायांना सहा सहा बोटे आहेत. त्यामुळे तिचे काम आणखीनच कठीण झाले. सहा बोटे असणाऱ्या पायांनी धावणे, उड्या मारणे वेदनादायकच. सहा बोटे असल्याने तिच्या मापाचे बूटही मिळंणे मुश्‍किल. नेहमीच्या बुटात तिची सहा बोटे दबली जाऊन वेदना होत. पण तशाच अवस्थेत तिने सुवर्ण यश गाठले.

यात तिला मोलाची मदत मिळाली ती गोस्पोर्टस फाऊंडेशनची. आणि ही मदत मिळाली ती भारताचा द वॉल-राहुल द्रविडच्या ऍथलेट मेंटॉर प्रोग्रॅममार्फत. 2013 मध्ये तिला स्कॉलरशिप मिळाली होते. स्पोर्टस ऑथॅरिटी ऑफ इंडियाच्या कोलकत्यातील केंद्रात तिचे प्रशिक्षण होत आहे.

हेप्थेथलॉन स्पर्धेत सात क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. त्यातील तीन धावण्याच्या स्पर्धा (100,200,800 मीटर्स) असतात. उंच उडी, लांब उडी, भाला फेक आणि गोळा फेक हे ते सात क्रीडा प्रकार. या सर्वातील कामगिरीरून विजेता ठरतो.

स्वप्नाने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला असला, तरी तिला मीडियात प्रसिद्धी वा सरकारकडून बक्षिसे मिळाल्याचे कोठे वाचनात नाही. एरवी कोटीच्या कोटी बक्षिसे उधळणारे खरोखर गरजू खेळाडूंबाबत हात आखडता का घेतात या प्रश्‍नाला उत्तर नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)