भाष्य : फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 3)

-रशिद किडवई (ज्येष्ठ पत्रकार-लेखक)

लोकसभेच्या निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांमधील निवडणूक ही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी घेणारी ठरणार आहे. सत्ताविरोधी मानसिकता आणि स्थानिक पातळीवर सक्षम नेत्यांची मांदियाळी ही दोन प्रमुख अस्त्रे हाती असूनसुद्धा कॉंग्रेसला त्यांचा फायदा घेता आला नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील महाआघाडीच्या नेतृत्वाविषयी आणि ओघानेच अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळेच उमेदवारांची निवड करताना कॉंग्रेसला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

याखेरीज पक्षाबाहेरून येणारे इच्छुक, अन्य राजकीय पक्षांमधील बंडखोर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, माजी नोकरशहा, शेतकऱ्यांचे नेते असे अनेकजण उमेदवारीसाठी पक्षाचे दरवाजे ठोठावत असतातच. याही बाबतीत पक्षातील दावेदारांना बाजूला करून नव्यांना संधी देण्याच्या निर्णयाची जबाबदारी राहुल गांधी यांनाच स्वीकारावी लागेल. कारण अंतिम निर्णय त्यांचाच असणार आहे.

जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठी साथ दिली. या पार्श्‍वभूमीवर, बाहेरून पक्षात येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची झाल्यास, त्या-त्या मतदारसंघातील प्रस्थापित नेत्याला दुखावण्याची जोखीम पत्करावी लागणार आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे असलेले नियोजन स्पष्टपणे दिसत आहे. शिवराजसिंह चौहान आणि भाजपच्या 15 वर्षांच्या शासनकाळाबद्दल असणाऱ्या नाराजीवरच हे नियोजन आधारलेले आहे आणि कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे पक्षाकडून दर्शविले जात आहे. एससी-एसटी कायद्याच्या विरोधात असलेल्या सवर्ण वर्गाचा ओढा कॉंग्रेसकडेच आहे. बहुजन समाज पक्षाबरोबर कॉंग्रेसची आघाडी झाली असती, तर राजपूत आणि ब्राह्मण मतदारांनी कॉंग्रेसच्या पर्यायाचा पुनर्विचार केला असता, असे कॉंग्रेसमधील धुरिणांचे स्पष्ट मत आहे. हा वर्ग जनमत तयार करण्यात अत्यंत प्रभावी आहे.

चौहान यांच्या सरकारविरोधात शेतकऱ्यांची नाराजी दोन वर्षांपासून उघडपणे दिसत आहे. याखेरीज व्यापमं घोटाळा युवकांच्या आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनात अद्याप ताजा आहे. ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजयसिंह, कमलनाथ, सुरेश पचौरी, सत्यव्रत चतुर्वेदी, अजयसिंह आणि अन्य प्रादेशिक नेत्यांच्या जोरावर कॉंग्रेसची मध्य प्रदेशात मोठी ताकद आहे. आपापल्या क्षेत्रात या नेत्यांचा चांगला दबदबा आहे. सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी आणि सक्षम स्थानिक नेते या दोन महत्त्वाच्या बाबी हातात असूनसुद्धा जर पक्ष त्यांचा फायदा घेण्यात अयशस्वी ठरत नसेल, तर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना पक्षासोबत युती केल्यामुळेही कॉंग्रेसच्या पदरात फारसे काही पडेल असे मानता येत नाही.

त्यामुळेच राहुल गांधी आणि कमलनाथ यांनी आघाडीची जोखीम पत्करलीच नाही. आता ताकद सिद्ध करणे ही कॉंग्रेसच्या नेतृत्वाची आणि स्थानिक नेत्यांची जबाबदारी ठरते. या तीन राज्यांमध्ये सत्ताविरोधी मानसिकतेचा लाभ घेण्यात कॉंग्रेस स्वबळावर यशस्वी ठरली, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची मोट आपसूक बांधली जाईल आणि तितक्‍याच आपसूकपणे या महाआघाडीचे नेतृत्व कॉंग्रेसकडे चालून येईल.

मात्र, तसे घडले नाही तर स्थानिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर कॉंग्रेस आणखी क्षीण होईल आणि त्याची जबाबदारी राहुल यांच्यावरच येणार असल्यामुळे या राज्यांमधील निवडणूक ही राहुल यांच्यासाठी सत्त्वपरीक्षा असणार आहे.

फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 1)    फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)