भाष्य : फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 2)

-रशिद किडवई (ज्येष्ठ पत्रकार-लेखक)

लोकसभेच्या निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांमधील निवडणूक ही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी घेणारी ठरणार आहे. सत्ताविरोधी मानसिकता आणि स्थानिक पातळीवर सक्षम नेत्यांची मांदियाळी ही दोन प्रमुख अस्त्रे हाती असूनसुद्धा कॉंग्रेसला त्यांचा फायदा घेता आला नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील महाआघाडीच्या नेतृत्वाविषयी आणि ओघानेच अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळेच उमेदवारांची निवड करताना कॉंग्रेसला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये तर कॉंग्रेसपुढे अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळविणे हे केवळ राहुल गांधींच्या नेतृत्वाच्याच दृष्टीने आवश्‍यक आहे असे नाही, तर नरेंद्र मोदी यांना सक्षमपणे टक्कर देऊ शकणारा आणि राष्ट्रीय पातळीवर सक्षम पर्याय देऊ शकणारा पक्ष म्हणून कॉंग्रेसची प्रतिमा निर्माण होण्याच्या दृष्टीनेही ते आवश्‍यक आहे.

सद्यःस्थितीत ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कॉंग्रेससाठी अत्यावश्‍यक आहे. नेमक्‍या याच बाबतीत पक्षाला आत्मविश्‍वास आणि योग्य तंत्राची कमतरता जाणवते. केंद्र आणि मिझोराम वगळता विधानसभा निवडणुका होत असलेल्या अन्य सर्व राज्यांमध्ये कॉंग्रेस सत्तेपासून दूर आहे. एवढेच नव्हे तर या राज्यांमधील गुप्तवार्ता विभाग, पोलिस आणि नोकरशहांकडूनही पक्षाला कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. अर्थात, गुप्तवार्ता विभागाकडून प्राप्त झालेली माहिती विश्‍वसनीय असतेच असेही नाही.

या वातावरणात तडजोडी आणि आघाड्यांचे जुने तंत्र वापरावे की, अस्तित्वात असलेल्या विधानसभांमधील सदस्यांना मैदानात उतरवावे या द्विधावस्थेत राहुल गांधी सध्या सापडले आहेत. सध्याच्या आमदारांबद्दल स्थानिक नागरिकांच्या मनात असंतोष दिसत आहे. स्पष्ट आणि अनुभवावर आधारित विश्‍लेषण केल्याखेरीज विद्यमान आमदारांना मैदानात उतरविणे धोक्‍याचे ठरू शकते. दुसरीकडे, विद्यमान आमदारांना तिकिटे न देण्याचेही काही धोके आहेत. कारण जातीय समीकरणे आणि सध्याच्या आमदारांविषयी असलेल्या नाराजीचा चपखल अंदाज न बांधल्यास याही बाबतीत धोका संभवतो.

संसदीय लोकशाहीत हा धोका अंतर्भूतच आहे आणि नेत्याला आपल्या निर्णयाबद्दल पश्‍चात्ताप करण्याची वेळ अनेकदा येते. कॉंग्रेसचा इतिहास असे सांगतो की, निवडणुकीसाठी प्रादेशिक नेत्यांना महत्त्व दिले जाते आणि उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेत त्यांचीच भूमिका निर्णायक ठरते. अशा स्थितीत उपलब्ध पर्यायांमधूनच राहुल यांना निवड करावी लागेल. ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजयसिंह, कमलनाथ, अशोक गहलोत, सचिन पायलट किंवा मोतिलाल व्होरा यांचा सल्ला धुडकावणे

राहुल यांच्यासाठी सोपे असणार नाही. परंतु जर पदरात अपयश पडले, तर हे नेते जबाबदारी स्वीकारतील का, हा प्रश्‍न आहे. हे नेते अपयशाचे खापर स्वतःच्या डोक्‍यावर फुटू देणार नाहीत.

फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 1)   फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)