भाष्य : फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 1)

-रशिद किडवई (ज्येष्ठ पत्रकार-लेखक)

लोकसभेच्या निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांमधील निवडणूक ही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी घेणारी ठरणार आहे. सत्ताविरोधी मानसिकता आणि स्थानिक पातळीवर सक्षम नेत्यांची मांदियाळी ही दोन प्रमुख अस्त्रे हाती असूनसुद्धा कॉंग्रेसला त्यांचा फायदा घेता आला नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील महाआघाडीच्या नेतृत्वाविषयी आणि ओघानेच अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळेच उमेदवारांची निवड करताना कॉंग्रेसला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असणार आहे. तत्पूर्वी पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका ही पक्षातील नेतृत्व सिद्ध करण्याची त्यांच्यासाठीची अखेरची संधी असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुका अधिक महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यास कॉंग्रेस किती सक्षम आहे, याचाही फैसला या निवडणुकांमधूनच होणार आहे. त्या दृष्टीने ही शेवटची संधी साधायची झाल्यास, चित्रपट क्षेत्रात ज्याप्रमाणे मनमोहन देसाई यांच्याकडे एक हुकमी फॉर्म्युला होता, तसा राहुल गांधींकडे आजमितीस दिसत नाही. मंदिर, मशिदीत हजेरी लावण्यापासून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला.

रोड-शो आणि सभा केल्या. परंतु त्यातून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला निश्‍चितपणे यश मिळणारच, असे स्पष्ट चित्र अद्याप उभे राहू शकलेले नाही. अर्थात, पक्षांतर्गत विश्‍लेषकांनी राहुल गांधी यांना आश्‍वासक चित्र दाखविले आहे. तज्ज्ञ विश्‍लेषकांकडून तीन सर्वेक्षणे करून घेण्यात आली आहेत आणि पक्षातील धुरिणांनी कॉंग्रेस पक्षाला या तीनही राज्यांमध्ये बहुमत मिळेल, असे संकेत दिले आहेत.

महाआघाडीची कल्पना बाजूला ठेवून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी धोका पत्करला आहे आणि जोखीम स्वीकारल्यानेच यश मिळू शकते, अशी आपली धारणा असल्याचे दाखवून दिले आहे. जोपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात कुणाच्याही कुबड्या न घेता, स्वतःच्या ताकदीवर यश मिळू शकत नाही, तोपर्यंत 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाआघाडीचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्‍वास मिळणार नाही, हे कॉंग्रेसने ओळखले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकांचे निकाल केवळ विजयासाठीच नव्हे तर अस्तित्वासाठीही कॉंग्रेसला महत्त्वाचे ठरणार आहेत. देशाच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर दृष्टिक्षेप टाकला असता, कॉंग्रेससारख्या सर्वांत जुन्या पक्षाची चिंता समजून घेता येते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू यांसारख्या मोठ्या राज्यांत कॉंग्रेसची ताकद नगण्य आहे. कर्नाटक, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये कॉंग्रेसला आघाडीच्या राजकारणाचा आधार घ्यावा लागत आहे.

फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 2)   फायनलपूर्वीची सत्त्वपरीक्षा (भाग 3)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)