पोलिटिकल : आमनेसामने की बरोबर ? (भाग-2)

पोलिटिकल : आमनेसामने की बरोबर ? (भाग-1)

-विदुला देशपांडे (ज्येष्ठ पत्रकार)

पंचवीस वर्षांहून अधिक काळ युतीत असलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील नाते खरे तर गोंधळात टाकणारे आहे. एकाच वेळी सहकार्य आणि विरोध असे विचित्र नाते या दोन्ही पक्षांत दिसून येते. युतीची अपरिहार्यता दोन्ही पक्षांना आहे. भाजपने शिवसेनेबरोबर युती होणार अशी भूमिका घेतली आहे. पण शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. पंढरपूर येथे झालेल्या अत्यंत महत्वाच्या सभेतही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूप तोंडसुख घेतले, पण युतीचा निर्णय जनताच घेईल असे सांगितले. याचा अर्थ काय घ्यायचा?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात डावपेचात्मक दृष्टीने बघायला गेले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच बाजी मारली आहे. मराठा आरक्षणाचा एक मोठा आणि अतिशय महत्वाच्या मुद्यावर अतिशय कौशल्याने ठोस निर्णय घेऊन त्यांनी स्वत:विषयी आणि पक्षाविषयी एक आश्‍वासक वातावरण तयार केले आहे.

उद्धव ठाकरेंनी रफाल, पीकविम्याचे खासगी कंत्राट वगैरे मुद्दे काढून पहारेकरी चोऱ्या करू लागलेत असे म्हटले, देवादिकांच्या बाबतीत जुमलेबाजी करू नका असा सज्जड दम दिला आणि आपली ठोकशाहीची भाषा अजूनही चांगलीच धगधगती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळे युतीत आपली बाजू वरचढ असायला पाहिजे या एकाच भावनेतून होत आहे, हे स्पष्ट दिसते आहे. जागावाटप गेले खड्ड्यात असे ते म्हणत असले तरी राज्यात आपला वरचष्मा रहावा या हेतूनेच त्यांचे राजकारण सुरू आहे. तीन राज्यातील पराभवामुळे आणि कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली आकाराला येत असलेल्या महाआघाडीमुळे शिवसेनेचा आवाज वाढणे स्वाभाविक आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि नंतरच्या काळातील नगरपरिषदा, महापालिका, पंचायत समित्या यांवर आपली पकड मजबूत केल्यानंतर भाजपाचा थोरल्या भावाचा आवाज काहीसा वाढला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष परस्परविरोधी लढले होते, तेव्हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदीची धार किती टोकाला पोहोचली होती, हे राज्याने पाहिले आहे. तथापि, तेच मुख्यमंत्री गेल्या काही महिन्यांत शिवसेनेसोबत युती होणारच आणि आगामी निवडणुका युतीच जिंकेल अशी भाषा करत आहेत. याचा अर्थ शिवसेनेशी मागील दाराने हातमिळवणी झालेलीच आहे, असा अर्थ घेतला जात आहे. उद्धव ठाकरेही जागावाटप खड्डयात घालण्याची भाषा करून एक प्रकारे युती अटळ असल्याचेच सुचवत आहेत.

आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. पण मराठा आरक्षण झाले म्हणजे आपलेही होणार हा विश्‍वास देण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालात काढून भाजपने विरोधकांवर बाजी मारली आहे. शिवसेनेच्या हातूनही हा मुद्दा आता निसटला आहे. कारण या बाबतचे श्रेयही त्या पक्षाला घेता येणार नाही, सत्तेत असूनही.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे पहावे लागेल. भाजपबरोबरच्या युतीत शिवसेनेला थोरल्या भावाचे स्थान पाहिजे आहे आणि आताचा भाजप हे स्थान त्याला द्यायला तयार नाही. कारण आता भाजपची ताकद वाढलेली आहे. 14च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढल्या. त्यात भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या (122) आणि तेव्हापासून शिवसेनेचे आणि भाजपचे परस्परांशी असलेले नाते बदलले.

आधी शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता, ती जागा आता भाजपला हवीहवीशी वाटू लागली आणि तेथून या दोघांचे बिनसत गेले. नंतरच्या चार साडेचार वर्षांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आपला प्रभाव चांगलाच दाखवला. मुंबई महानगरपालिकेतही शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा भाजपने कमी जिंकल्या. पण तरीही शिवसेना भाजपबरोबर आहे याचे कारण राज्यातील राजकारण.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर भाजप आणि शिवसेनेला एकत्र रहावे लागणार आहे. शिवसेना भाजपबरोबर असणार हे नक्की. प्रश्‍न आहे तो शिवसेनेला पाहिजे असलेला वडिलकीचा मान भाजप देणार की नाही हा. निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेचा रोष ओढवून घ्यायच्या मन:स्थितीत नाही. म्हणूनच इतके बोचरे भाषण करूनही उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याविरोधात भाजपच्या कुठल्याच नेत्याने चकार शब्दही काढलेला नाही.

निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी युती आणि आघाडीतील सगळ्याच पक्षांची धडपड सुरू असते. शिवसेनाही त्याला अपवाद नाही. निम्म्या निम्म्या जागांचा फॉर्म्युला किंवा स्वतंत्र निवडणुका लढवणे हे दोनच पर्याय आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला मोठे आव्हान उभे केले तरच विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेची बाजू वरचढ राहील याची जाणीव झाल्याने शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)