पोलिटिकल : आमनेसामने की बरोबर ? (भाग-1)

-विदुला देशपांडे (ज्येष्ठ पत्रकार)

पंचवीस वर्षांहून अधिक काळ युतीत असलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील नाते खरे तर गोंधळात टाकणारे आहे. एकाच वेळी सहकार्य आणि विरोध असे विचित्र नाते या दोन्ही पक्षांत दिसून येते. युतीची अपरिहार्यता दोन्ही पक्षांना आहे. भाजपने शिवसेनेबरोबर युती होणार अशी भूमिका घेतली आहे. पण शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. पंढरपूर येथे झालेल्या अत्यंत महत्वाच्या सभेतही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूप तोंडसुख घेतले, पण युतीचा निर्णय जनताच घेईल असे सांगितले. याचा अर्थ काय घ्यायचा?

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. आता 2019ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे आणि त्यामुळे राजकारणाचे हे गोंधळलेपण आणखी वाढतच चालले आहे. भाजपपेक्षा पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य बनवून राजकारण केले जात आहे. पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाषणात तेच केले आहे. देशात घडणाऱ्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरत त्यांच्यावर आडवी तिडवी टीका करण्याची प्रथा उद्धव ठाकरे यांनीही तशीच चालू ठेवली. पण यातून राज्यात शिवसेना काय करणार हे काही स्पष्ट झाले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र राममंदिरावरून भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जाईल हे स्पष्ट झाले.
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांतील सत्ता भाजपने गमावल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा आपण सहज पराभव करू शकतो असा विश्‍वास कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमध्ये आला आहे. त्याच भावनेतून महाआघाडीची चर्चाही जोशात आणि उत्साहात सुरू आहे. पण तरीही भाजपचे आव्हान पेलणे तितकेसे सोपे नाही याची जाणीव सगळ्यांनाच आहे.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचा प्रश्‍न महत्वाचा आहे. भाजपचे नेते शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण शिवसेनेकडून युतीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. पंढरपूर येथे झालेल्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत काहीही विचार केलेला नाही.

राज्यातील विधानसभा निवडणुकी आधी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे आधी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात फटकेबाजी केली. यातून भाजपवर दबाव आणायचे तंत्र होतेच. पण त्यामुळे भाजपची काही पंचाईत होईल असे नाही. किंबहुना जरी युती झाली नाही तरी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नुकसान होण्याची शक्‍यता नाही. शिवसेनेचे पारडे जड होईल. पण शिवसेना रालोआतून बाहेर पडणार नाही याची खात्री देता येते. कारण शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका.

शिवसेनेने आपले हिंदुत्ववादी धोरण अधिक आक्रमक केले आहे. राम मंदिर उभारण्यावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. राममंदिर केव्हा बांधणार हे स्पष्ट सांगा असा आग्रह शिवसेनेचा आहे. राम मंदिराच्या मुद्यावरून आपले आक्रमक राजकारण पुन्हा करू पाहत आहे आणि त्यासाठी त्यांना राम मंदिराचा मुद्दा मिळाला आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्याच्या निकालातून मग विधानसभेच्या राजकारणाची दिशा ठरवायची असे शिवसेनेचे ठरलेले असू शकते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महत्वाच्या राज्यांतील सत्ता भाजपने गमावलेली आहे. इथे भाजपचा पराभव झाला असे म्हणण्यापेक्षा सत्ता गमावली असेच म्हणावे लागेल. कारण कॉंग्रेसने या राज्यांमध्ये दैदिप्यमान वगैरे असा विजय मिळवलेला नाही. मध्य प्रदेशात तर बसपच्या साथीने त्यांना सत्ता स्थापन करावी लागली आहे. त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली नाही, पण भाजपचे आव्हान त्यामुळे तोकडे पडले असा त्याचा अर्थ होत नाही. हेच महाराष्ट्रातही म्हणावे लागेल.

पोलिटिकल : आमनेसामने की बरोबर ? (भाग-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)