#आगळेवेगळे : देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा (भाग २) 

#आगळेवेगळे देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा  (भाग १)

-अनुराधा पवार

गणपती जवळ आले की आमच्या काकांच्या कपाळाला आठ्या पडतात. ते तसे नास्तिक वगैरे मुळीच नाहीत. बरेच देवभक्त आहेत. घरात पूजाबिजा करतात, संध्याकाळी अगरबत्ती लावतात. पण गणपती उत्सव म्हटले की ते प्रचंड वैतागलेले असतात.

एके काळी पुणे हे सायकलींचे शहर होते. सर्वात जास्त सायकली पुण्यात होत्या. सायकली भाड्याने देणारी दुकाने होती. मी अगदी लहान असताना आमच्या घराशेजारी रिगल आणि रॉयल नावाची दोन सायकलची दुकाने होती. भाड्याने सायकली देणारी. दोन्ही दुकानांत शेकड्यात सायकली होत्या. रिगलमध्ये लेडीज सायकली मिळायच्या तेव्हा, त्या सायकलींचे मोठे कौतुक.

तेव्हा एक आणा तास सायकल मिळायची. आणि महिन्यावर घेतली तर 30 रुपये महिना मिळायची असे माझे मामा सांगतात. सध्याच्या काळात पुण्याच्या रस्त्यावर सायकल फारशी दिसत नाही. भाड्याने सायकली देणारी सायकलची दुकाने शोधावी लागतात आणि शोधूनही मिळत नाहीत. मुळात पुण्यात सायकलीच दिसत नाहीत. कुठे कुठे सायकल ट्रॅक दिसतात, पण बिना सायकलचे.

आता दिसतात टूू व्हीलर्स. भरपूर. कोणत्याही मुख्य रस्त्याने जा, छोट्या रस्त्याने जा, अगदी गल्लीबोळातून जा : ..टू व्हीलर्सची मारुतीच्या शेपटासारखी न संपणारी लाईन दिसेल. पाणी खाचखळग्यातूनही सफाईदारपणे वाहाते, तसे पुण्यातील टू व्हीलरवाले अगदी सफाईदारपणे जात असतात.

सरळ रस्त्याने, रस्त्यावरील खड्ड्याखुड्ड्यातून आणि नो एंट्रीतूनही. ट्रॅफिक जॅम करण्यात पुण्यातील टू व्हीलर्सवाल्यांनी पीएचडी मिळवलेली असावी. चौकामध्ये विशेषत: सिग्नल नसताना एका टू व्हीलरवाल्याने रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, की त्याच्यामागे बाकी स्कूटरवाले, मोटर बाईकवाले अगदी हाती हात मिसळून रस्ता क्रॉस करू लागतात. त्यांचे पूर्ण होईपर्यंत फोर व्हीलरवाले हॉर्नवर हात ठेवून रस्ता मिळण्याची वाट बघत उभे राहतात.

शांत चित्ताने. समजा, पुण्यातील ट्रॅफिक शिस्तबद्‌, शूर आणि सुरळीत झाली तर. . . . . .
देवा, गजानना, – बाकी काही नको, पण एवढ्या पुण्याच्या ट्रॅफिकला शिस्त लागू दे रे बाप्पा. . . ..

मांडव, ढोल, ताशे, लाऊडस्पीकर हे सारे तात्पुरते सणांपुरते असते; पण वाहतूक समस्या मात्र वर्षभर तशीच असते- तिला शिस्त लावलीस ना, तर ट्रॅफिक पोलीसांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सारे ऋणी राहतील तुझे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)