जीवनगाणे : मृगजळामागची धाव…

अरुण गोखले

माणसाचं मन हे त्या हरणासारखं आहे. हरणाला दूर दिसणार मृगजळ हेच खरं पाणी आहे असं वाटत. हरीण त्यामागे धावत सुटते. ते मृगजळ मागं मागं सरकत असतं आणि हरीण त्यामागे धावत असत, भान विसरून. माणसाचं अगदी तसंच आहे. तोसुद्धा खोट्या सुखालाच खरं सुख मानतो आणि त्यामागे आयुष्यभर ऊर फुटेपर्यंत धावत असतो.

माणसाच्या सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या कल्पना या वृत्तीनिष्ठ नाही, तर त्या वस्तुनिष्ठ आहेत. सुखाची साधने मिळाली म्हणजे सुख मिळाले, ही त्याची भ्रामक कल्पना आहे. माणूस अज्ञानाने सुखाच्या साधनालाच सुख मानतो. त्याला वाटत की मला धनदौलत मिळाली, पैसा अडका गाठीशी आला, घरादाराची उभारणी झाली, ऐषोआरामाची साधने मिळाली, हव्या त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे मी सुखी समाधानी झालो. पण खरं तर तीच त्याची सर्वात मोठी चूक असते.

माणसाला सुखाची साधने मिळतात. पण साधनांच्या माध्यमातून जो सुखाचा अनुभव त्याला मनाला, चित्ताला अनुभवायला यायला हवा तो मात्र मिळत नाही. सुखाच्या मृगजळामागच्या धावपळीत त्याचं शरीर स्वास्थ्य हरवलेलं असत. मन थकलेलं असत. रसनेची गोडी आणि डोळ्यातली झोप हरवलेली असते. त्याच्या समोर उभ्या असणाऱ्या सुखाच्या साधनांतून त्याला तृप्तीचा आनंद, समाधानाची ढेकर किंवा साधी सुखाची शांत झोपही येत नाही.

कारण सततच्या धावपळीन त्याचं मन सैरभैर झालेलं असत. ती मनाची चंचलता त्याला शांतीच सुख अनुभवायला देत नाही. निवांतपणा देत नाही. स्थैर्य, स्थिरता, शांती या गोष्टी त्याच्यापासून फार दूर गेलेल्या असतात. त्यांच्या चिंता त्याला क्षणोक्षणी जाळत असतात. आधी संपत्ती नाही म्हणून चिंता आणि धावपळ आणि नंतर जी संपत्ती मिळाली ती टिकवायची कशी याची चिंता.

या जीवघेण्या धावपळीत त्याच्या जीवनातले आनंद गीत हेच हरवलेले असते. सूर बेसूर झालेले असतात. ताल बिेघडलेला असतो. लय तुटलेली असते, साथ आणि साथीदार मागे पडलेले असतात. त्याचा जगण्यातला उत्साहच कमी कमी झालेला असतो.

खरं तर असं होता कामा नये, जीवन हे एक आनंद गीत आहे. ते ज्याने त्याने आपापल्या सुरात गाऊन त्याचा आस्वाद घ्यायला हवा. हे ओळखून वेळीच थांबायला हवं. नेमकं केव्हा आणि कुठे थांबायचं हे ज्यानं त्यानं विवेकानं ठरवायला हवं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)