नियम शिष्टाचाराचे…

अस्मिता सर्वांची आवडती आहे, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, तिचे मृदू बोलणे, नम्र आणि संयमशील वागणे. मोठ्यांशी मर्यादेने आणि लहानांशी लहान होऊन खेळीमेळीने वागणे. एकूण तिला घरचे वळण फार चांगले आहे, असे सर्वच म्हणतात. हे वळण म्हणजे जगात वागावे कसे याचे शिक्षण.

जगात वागावे कसे, बोलावे-चालावे कसे याचे शास्त्र म्हणजे शिष्टाचार-मॅनर्स! सामान्यत: ,तुम्ही कसे वागता, यावरून तुमची प्राथमिक परीक्षा केली जाते. पण शिष्टाचार हे समाजात वावरताना वापरायचे नियम आहेत, पण ते काही तुमच्या चारित्र्याचे निदर्शक नाहीत. कारण शिष्टाचार हे झाडाच्या सालीसारखे बाह्य आवरण आहे. झाडाच्या सालीवरून अंतरंगाची थोडीशीच कल्पना येऊ शकते, म्हणून अंतर्बाह्य प्रामाणिकपणा हाच सर्व शिष्टाचाराचा पाया असला पाहिजे.

तुम्हाला चांगली चालरीत असावी व तुमचे वागणे शिष्टाचाराचे व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, तर खालील नियम पाळल्यास तुम्हाला वेगळा शिष्टाचार शिकण्याची जरूर भासणार नाही.
1) दुसऱ्याचे दोष पाहात बसू नका, गुण पाहा. समोरच्या माणसाच्या मनात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचा राग तुम्हाला येणार नाही. समोरच्या माणसाच्या र्मयादा असतात, त्या समजून घ्या.
2) प्रत्येक माणूस स्वत:ला श्रेष्ठच समजतो. अगदी लहान मुलालाही प्रतिष्ठा असते, म्हणून कोणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लावू नका.
3) जरूर नसताना दुसऱ्याला उपदेश करू नका. मशागत झालेल्या जमिनीवर पाऊस पडल्यास तेथे बीज अंकुरते. खडकावरील पाणी वाहून जाते.
4) तुम्हाला भेटणाऱ्या माणसाचा जो अभ्यासविषय असेल त्यात रस दाखवा. त्यामुळे त्याला उत्तेजन मिळेल आणि तुमच्याही ज्ञानात भर पडेल.
5) नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा. दुर्मुखलेल्या, रडक्‍या चेहऱ्याचे कोठेही स्वागत होत नाही.
6) प्रत्येकाला आपले नाव व आडनाव अतिशय प्रिय असते. नावावरून वा आडनावावरून कोणाची टिंगलटवाळी किंवा चेष्टा करू नका, शिवाय परिचयाच्या सर्व माणसांची नावे व आडनावे अचूक लक्षात ठेवा. अभ्यासाने हे साध्य होते.
7) उत्तम संभाषण कला म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे. तुम्ही स्वत: कमी बोला आणि समोरच्या माणसाला बोलण्यास उत्तेजन द्या. त्यातून तुमचे ज्ञान वाढेल व समोरच्या माणसालाही मन मोकळे केल्याचे समाधान लाभेल.
8) नेहमी स्वत:चीच टिमकी वाजवू नका. समोरच्या माणसाच्या हिताची व उत्कर्षाची चर्चा करा.
9) नेहमी नीटनेटका व स्वच्छ पोषाख ठेवा, पण भडक व श्रीमंती दाखवणारे कपडे करू नका किंवा अंगभर लक्ष्मीधराप्रमाणे अलंकारांचे ओझे घेऊन फिरू नका.
10) तुमचे वर्तन तुमच्या ध्येयाशी सुसंगत ठेवा. उदा. संन्याशाचा वेष करणाऱ्याने तमाशा पाहायला जाता कामा नये.
11) नम्रता व शालीनता कधीही सोडू नका, पण नम्रता व लाचारी यातील सीमारेषा स्पष्टपणे ओळखा.
12) स्वत:चे गुणगान व स्तुती कधीही करू नका. रामदासांनी ते एक मूर्खाचे लक्षण सांगितले आहे.
13) तुमचे गुण तुमच्या कार्यातून दिसले पाहिजेत. तुम्ही श्रेष्ठ असलात तरीही आपल्याभोवती खुषमस्करे बाळगू नका.
14) क्रोध, द्वेष, मत्सर, शिष्टाचाराचे हाडवैरी आहेत.
15) दुसऱ्याच्या मनाला लागेल असे विनोदातही बोलू नका. विनोद बोचरा नसावा. स्वत:वर केलेला विनोद हाच सर्वश्रेष्ठ विनोद असतो.

अलीकडे शिष्टाचार म्हणजे केवळ दिखाऊपणा, ढोंगीपणा व दांभिकपण असे काहींना वाटते, काही प्रमाणात ते खरे असेलही.पण काही प्रमाणात. वरील नियम तुम्ही कटाक्षाने पाळले, तर शिष्टाचार तुमच्या स्वभावात मुरेल.

– योगिता जगदाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)