#आगळे वेगळे : गोकुळाष्टमी, दहीहंडी आणि शुध्द भावना…(भाग १)

-अनुराधा पवार

गोकुळाष्टमी आली, की अनेक आठवणी मनात पिंगा घालू लागतात. कृष्ण हा आम्हा भारतीयांचा अत्यंत लाडका देव. त्याच्या दह्यादुधाची चोरी करणाऱ्या कान्हापासून ते रास रचणाऱ्या गोविंदापासून ते गीता सांगणाऱ्या योगेश्‍वर कृष्णापर्यंत अनेक रूपे आमच्या हृदयात ठाव मांडून बसली आहेत.

त्याच्या जन्मापासूनच, जन्मापासून का? त्यापूर्वीपासूनच सगळ्या गोष्टी अद्‌भूतरम्य.

वसुदेव देवकीची वरात जात असतानाच आकाशवाणी झाली, की कंसा, देवकीचा आठवा पुत्र तुझा मृत्यू बनणार आहे. झाले, आपल्या बहिणीचा विवाह सोहळा अत्यंत आनंदाने करणारा कंस क्षणार्धात बदलला. तो देवकीचा भाऊ, तिचा वैरी बनला. तिला मारायला निघाला. “न रहे बांस न बजेगी बन्सी’ हा त्याचा खाक्‍या होता, पण कृष्णाची बन्सी घुमायचीच होती.
देवकी वाचली. कायमची तुरुंगात गेली. तिची सहा अपत्ये कंसाने मारली. सातवी कन्या कंसाच्या हातून विजेसारखी सुटून आणि आठव्याची आठवण देऊन गेली.

कृष्णजन्म झाला. काळोख्या रात्री, मुसळधार पावसात, विजांच्या लखलखाटात, यमुनेला पूर आला असताना, पण विपरीत परिस्थितीत कृष्ण जन्मला आणि गोकुळात गेला. अर्थात जिथे कृष्ण जाईल तेथे गोकुळच होणार. आनंदी आनंद होणार हे तर ठरलेलेच आहे.

हा कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो….गोकुळाष्टमीला. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, दहीहंडी करतो. माझ्या अगदी बालपणापासूनची ती दहीहंडी फोडण्यातील गंमत मला आठवते. (आज तिचे स्वरूप बदलले आहे. शिंक्‍यावरचे दहीदूध अगदी तिसऱ्या-चवथ्या मजल्यावर पोहोचले आहे. दहीहंडीची उंची वाढली, तिच्यातील दही-ताक जाऊन लाखालाखाची बक्षिसे लागली, पण तो सोज्ज्वळ आणि भाबडा उत्साह-आनंद मात्र कुठेतरी हरवत चालला आहे.

मी लहान असताना आम्ही कोकणात होतो. महाडला. तेव्हा काही दहीहंड्या फारशा उंच बांधल्या जात नसत. दहीहंडी फोडणारे गोविंदाही पाचपन्नासच असायचे. त्याला प्रेक्षक त्या भागातलेच असायचे. सारे काही शॉर्ट अँड स्वीट म्हणतात तसे असायची.

गोविंदांचे तीन-चार थर म्हणजे डोक्‍यावरून पाणी. आणि तेव्हा अशा लाखा लाखाच्याही दहीहंड्या नव्हत्या. दहीहंडीत असायचे दही-ताक… आणि दहीहंडी फोडली की ते गोविंदांच्या अंगावर सांडायचे. हंडीच्या मडक्‍याचे तुकडे जमा करण्यासाठी नुसती झुंबड उडायची. माझ्या भावाने एक तुकडा आणला की, माझी आई फार खुष व्हायची.

भावाला शाबासकी द्यायची आणि त्याने आणलेला तो दहीहंडीच्या मडक्‍याचा तुकडा अगदी आवडीने, भक्तिभावाने दूधदुभत्याच्या कपाटात ठेवायची. तेव्हा रेफ्रिजरेटर वगैरे गोष्टी घरात आलेल्या नव्हत्या. दुधदुभत्याची लाकडी कपाटे असत, जाळीच्या दरवाजांची. त्याला दोन किंवा तीन कप्पे असत. एक कप्पा दूधदुभत्यासाठी आणि एक अन्नासाठी. तिसरा असलाच तर तो राखीव असायचा लोणच्यांच्या बरण्यांसाठी.

#आगळे वेगळे : गोकुळाष्टमी, दहीहंडी आणि शुध्द भावना…( भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)