आरटीओ कार्यालय? छे, ही तर कचराकुंडी!

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : कचरा, भंगार आणि अस्वच्छतेचा कळस

पुणे -स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच; शासकीय कार्यालयांकडून या सर्वेक्षणालाच हरताळ फासला जात आहे. दररोज हजारो लोकांची वर्दळ असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून, जागोजागी कचरा, भंगार आणि स्वच्छतागृहासह इतर ठिकाणीही अस्वच्छता असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयात प्रशिक्षणार्थी वाहनचालक तसेच वाहनांच्या कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांचा समावेश आहे. मात्र, इतकी वर्दळ असतानाही परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. मुख्य इमारतीच्या बाजूला कचऱ्याचा अक्षरश: ढिग साचला असून नागरिकांना याच परिसरात थांबावे लागते. हे कमी काय म्हणून जागोजागी भंगारातील वाहने तसेच कार्यालयाचे भंगार पडून असल्याने तेथेही कचरा साठलेला असून दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे.

महिलांची कुंचबना
या कार्यालयातील महिला स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय दयनिय आहे. अत्यंत बकाल अशा स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत असल्याने महिलांची गैरसोय होते. पिण्याच्या पाण्याच्या बेसिनजवळ गुटखा तसेच तंबाखूच्या पिचकाऱ्या मारून परिसर घाण करण्यात आलेला आहे. फुटलेल्या ड्रेनेजमधूनही अस्वच्छ पाणी बाहेर येत असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.

पालिकेचेही यंत्रणाही गप्पच
महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारला जात आहे. तर, शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेबाबत काहीच केले जात नसल्याचे वास्तव आहे. यापूर्वी अनेकदा स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक या ठिकाणांसह शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अस्वच्छता असतानाही, त्यांना समज देण्याची तसदीही महापालिकेने घेतली नाही. शहराचे स्वच्छतेचे मानांकन घसरून महापालिकेस टीकेचा सामना करावा लागत असतानाही; या शासकीय कार्यालयांबाबत काहीच केले जात नसल्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)