दिल्ली पोलिसांची चौकशीनंतर कारवाई
न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची कोठडी
नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी अपूर्वा शेखरला आजअखेर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अपूर्वाला दिल्ली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर शुक्रवारी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस सातत्याने अपूर्वा शेखरसह घरातील सहा जणांची चौकशी करत होते. चौकशीनंतर अपूर्वाला अटक करण्यात आली.
रोहित शेखर दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होता. नऊ दिवसांपूर्वी रोहित शेखर तिवारीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आई आणि पत्नी 16 एप्रिल रोजी रोहितला संध्याकाळी दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत घेऊन आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित शेखरच्या हत्येमध्ये अपूर्वाचा सहभाग होता. दिल्ली क्राईम ब्रान्चच्या चौकशीत अपूर्वाने सत्य कथन केले. सातत्याने बदलणाऱ्या अपूर्वाच्या जबाबामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय अधिक वाढला होता.
रोहित शेखरच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने घटनाक्रम समोर आला, त्यानंतर अपूर्वाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. हत्या झालेल्या रात्री अपूर्वा आणि रोहित यांच्यात वाद झाल्याचे चौकशीत समोर आले. त्या रात्री रोहित त्याच्या मैत्रिणीसोबत दारु पीत असल्याचे अपूर्वाने पाहिले होते. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. तसेच माहेरच्यांसाठी वेगळं घर बनवण्यावरुन अपूर्वा आणि रोहितमध्ये वाद झाला होता.
हत्येच्या रात्री दोघांमध्ये झटापट झाली आणि यावेळी अपूर्वाने रोहितचा गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांनी अपूर्वाच्या रक्ताचे नमुने आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या डागांचे नमुने घेतले होते.
पुरावे नष्ट करण्यासाठी अपूर्वाने तिचा मोबाईल फोनही फॉरमॅट केला. ज्या खोलीत रोहितची हत्या झाली, तिथला सीसीटीव्ही कॅमेरा खराब असल्याने संशय आणखीन बळाविला होता.