विज्ञानविश्‍व: रोबोट्‌स राहिले एयरबीएनबीमध्ये…

डॉ. मेघश्री दळवी

रोबोट्‌स आता वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागले आहेत. बॅंकांमध्ये किंवा थीमपार्कमध्ये येणाऱ्या व्यक्‍तींचं स्वागत करायला, घरात आजारी वा वृद्ध व्यक्‍तींची काळजी घ्यायला, अनेक कामात माणसांना मदत करायला.

या अत्याधुनिक रोबोट्‌समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असते. या बुद्धिमत्तेचं लक्षण म्हणजे अनुभवातून शिकत जाणे. आपणदेखील याच प्रकारे आपल्या ज्ञानात भर घालत असतो, क्षणोक्षणी विविध प्रसंगांना सामोरं जात शिकत असतो. पण आपल्यासाठी हे शिकणं जरी अत्यंत नैसर्गिक असलं तरी रोबोट्‌स बहुतेक वेळा प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणात (सिम्युलेशन) वावरतात. ठराविक परिसरात त्यांना प्रशिक्षण देण्याच्या मोजक्‍या घटना अनुभवतात. त्यापलीकडे त्यांना शिकायची संधी मिळणं जरा कठीणच असतं. पण मग प्रत्यक्ष काम करायची वेळ येईल, तेव्हा त्यांचे अनुभव तोकडे तर नाही ना पडणार, हा प्रश्‍न शास्त्रज्ञांना नेहमी सतावत असतो.

उदाहरण घ्यायचं तर घरात मदत करणाऱ्या रोबोट्‌सचं. हे रोबोट्‌स ज्या घरात जातील तिथे सराईतपणे वावरू शकले पाहिजेत. मात्र, प्रत्येक घर वेगळं, तिथल्या सामानाची रचना वेगळी, घरातल्या माणसांच्या सवयी वेगळ्या. त्यामुळे रोबोट्‌सना हे सगळं जमलं पाहिजे आणि त्यासाठी हवा वेगवेगळ्या घरांमधला भरपूर अनुभव. पण हा अनुभव आणायचा कुठून?

कार्नेगी-मेलन विद्यापीठातल्या संशोधकांचा एक गट रोबोट्‌सवर काम करत होते. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेतल्या रोबोट्‌सना स्वत:च्या घरी थोडे दिवस नेऊन ठेवलं. आपले शेजारी आणि मित्रांनाही विनंती करून त्यांच्या घरांमध्ये रोबोट्‌सना ठेवून बघितलं. पण एवढं पुरेसं नसल्याने त्यांनी यावर एक छान उपाय शोधला. रोबोट्‌सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी चक्‍क एयरबीएनबीमध्ये राहायला नेलं! एयरबीएनबीची कल्पना म्हटली तर साधी आणि तरीही हटके आहे. आपलं घर हॉटेलसारखं काही दिवसांसाठी भाड्याने वापरायला द्यायचं. पाहुणे येऊन चार-पाच दिवस राहून जाणार. त्यांनाही छान नवा अनुभव आणि आपल्यालाही थोडी कमाई अशी ही कल्पना. कार्नेगी-मेलन विद्यापीठातल्या संशोधकांनी रोबोट्‌सना एयरबीएनबीतर्फे वेगवेगळ्या घरांमध्ये राहायला नेलं. या घरांमध्ये राहून रोबोट्‌सनी नव्या जागेत सामानाच्या नव्या रचनेतून वाट काढली, नव्या वस्तू हाताळल्या, त्या जागच्या जागी ठेवल्या.

विविध आकाराच्या वस्तू आपल्या पंजात पकडणे, त्या वस्तू नाजूक असतील तर अलगद धरणे, उचलून ठेवताना आवश्‍यक तेवढाच जोर लावणे अशा लहान लहान गोष्टींमधून रोबोट्‌स शिकले. त्यांच्या चुका झाल्या, पण त्या चुकांमधूनच ते शिकत गेले, ज्यांनी आपली घरं रोबोट्‌सना दिली, त्यांना या प्रयोगाचं फार कुतूहल होतं.
हा पूर्ण डेटासेट आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष कार्नेगी-मेलनच्या संशोधक चमूने प्रकाशित केले. प्रयोगासाठी रोबोट्‌सना एयरबीएनबीमध्ये नेण्याची कल्पना खरोखरीच भन्नाट असून ती यशस्वी झाली हे महत्त्वाचं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)