विज्ञानविश्‍व : रोबोट्‌स खोल समुद्रात

-मेघश्री दळवी

पृथ्वीवर सुमारे 73 टक्‍के पाणी आहे आणि त्यातलं 97 टक्‍के महासागरात आहे. या महासागराच्या तळाशी अनेक गूढ, नवलाईच्या गोष्टी आहेत. पाण्याचा प्रचंड दाब आणि पूर्ण अंधार असूनही तिथे प्राणीजीवन चांगलं वाढलं आहे. दोनशेहून अधिक प्रकारचे अजब सागरी जीव तिथे आढळतात. त्यातल्या बहुतेक प्रजाती केवळ खोल समुद्रातच मिळतात.

या अद्‌भुत दुनियेचा वेध घ्यायचा तर आपण तितक्‍या खोलीवर पोहोचायला हवं. माणसाला ऑक्‍सिजन सोबत घेऊन किती खोलवर जाता येईल, यावर साहजिकच बंधन येतं. आतापर्यंत पाणबुडी वापरून काहीएक खोलीवर जाऊन नमुने गोळा करणं हा खोल समुद्रातल्या जीवांचा अभ्यास करण्याचा एक मार्ग होता. आता मात्र तिथे जाऊन काम करण्यात रोबोट्‌स आघाडीवर असतील.

हार्वर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी खोल समुद्रातल्या संशोधनासाठी एक खास रोबोट आर्म तयार केला आहे. तो पाणबुडीला जोडून नमुने मिळवण्यसाठी वापरता येईल. या रोबोटचे तीन भाग आहेत. तळाचा भाग गोल फिरतो, वरचा भाग आपल्या कोपरासारखा वाकू शकतो, तर सर्वात पुढचा पंजासारखा भाग नमुने अलगद उचलून घेऊ शकतो.

या रोबोटचा पंजा किंवा ग्रिपर अतिशय नरम पदार्थाचा बनवलेला आहे आणि त्याचे भाग अगदी काटेकोरपणे नियंत्रित करता येतात. त्यामुळे तो ऑक्‍टोपस, जेलीफिश अशा जीवांना कोणतीही इजा न करता हळुवारपणे उचलून पाणबुडीमध्ये आणू शकतो. अतिशय नाजूक प्रवाळांनाही अजिबात धक्‍का न लावता तो त्यातले जीव उचलून घेऊ शकतो.
आपल्या संशोधनामुळे मूळ परिसंस्था आणि त्यातले जीव यांना कोणतीही हानी पोचता नये, त्यांच्या जगण्यात कोणताही अडथळा येता कामा नये, असा संशोधकांचा नेहमी प्रयत्न असतो. त्याला अनुसरून या रोबोटची रचना करण्यात आली आहे.

हा रोबोट कमीतकमी विद्युतऊर्जा वापरेल व तो जिथे काम करेल तिथल्या पाण्याच्या तापमानात फारशी वाढ होणार नाही, याची दक्षताही संशोधकांनी घेतली आहे.

खोल समुद्रात जाऊन काम करू शकेल, अशा या रोबोटच्या हालचालींमध्ये एक विलक्षण सफाई आहे. या रोबोटचं नियंत्रण करायला एक खास कंट्रोल ग्लोव्ह आहे. हा ग्लोव्ह आपण आपल्या हातात चढवून ज्या ज्या हालचाली करू, त्याच हालचाली तो रोबोटचा हात अचूकपणे करू शकतो.

सागरी जीव हाताळू शकेल असा रोबोट बनवावा ही कल्पना आणि पुढील संशोधन यात हार्वर्ड विद्यापीठाच्या 20 इन्स्टिट्यूट्‌सचा पुढाकार होता. वेगवेगळ्या विद्यापीठांमधल्या संशोधकांनी एकत्र येऊन हा रोबोट तयार केलेला आहे.

अलीकडेच ब्राझीलमधील बेटांजवळ एका पाणबुडीसोबत त्याची चाचणी यशस्वी झाली. त्याची पूर्ण माहिती “नेचर’ या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. पहिली चाचणी सफल झाल्यानंतर हा रोबोट इतर संवेदनशील संशोधनातही वापरता येईल, असा त्यांचा दावा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)