अबाऊट टर्न: रोबो…

हिमांशू

भारतातला पहिला (नव्हे पहिली) रोबो पोलीस ड्यूटीवर जॉइन झाला आणि अनेकांना अनेक प्रश्‍न पडले. सोशल मीडिया तर प्रश्‍नांनी आणि जोक्‍सनी ओसंडून वाहू लागला. “पहिला रोबो पोलिस ड्यूटीवर जॉइन झाला, म्हणजे आतापर्यंत ड्यूटीवर होते ते कोण?’ असा खवचट प्रश्‍नही काहींनी विचारला. सौदी अरेबियाच्या “सोफिया’प्रमाणं एखादं सोपं नाव न देता “केपी-बॉट’ असं नाव या रोबो पोलिसाला दिलं गेलंय. (हे नाव आहे की रोबोचा प्रकार, याबद्दल अजून आमच्या मेंदूत संभ्रम आहे. कारण आमचा मेंदू अजूनही मानवी आहे.)

माणसासारखा दिसणारा रोबो “ह्यूमनॉइड’ म्हणून ओळखला जातो. त्रिवेंद्रमच्या पोलीस मुख्यालयात ड्यूटीवर रुजू झालेला रोबो तसाच आहे. रोबोमध्ये स्त्री-पुरुष भेद नसतो, हे न जाणणाऱ्यांनी “सोफिया’च्या आगमनावेळी विचारलेले टिपिकल प्रश्‍न याहीवेळी विचारले. रोबोचं केवळ बाह्यरूपच स्त्रीसारखं किंवा पुरुषासारखं असू शकतं. (या घटकेपर्यंत तरी! पुढचं काही सांगता येत नाही.) भारतातला पहिलावहिला रोबो पोलीस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर “ती महिलाच का?’ असा प्रश्‍न विचारणाऱ्या बहाद्दरांना प्रेमाचा सल्ला असा की, त्यांनी केरळमधल्या मातृसत्ताक संस्कृतीचं अध्ययन करावं. असे प्रश्‍न विचारणाऱ्या मंडळींना काही सांगायची सोय नसते. खुद्द “सोफिया’लासुद्धा असेच अडचणीत टाकणारे काही प्रश्‍न या विद्वानांनी विचारले होते. लग्न करणार का, असंही विचारलं म्हणे काहींनी!

पोलिस मुख्यालयात आलेल्या लोकांचं स्वागत करणं आणि गरजेनुसार निश्‍चित कार्यालयात जाण्याचा मार्ग सांगणं, असं काम “केपी-बॉट’ला सोपवलं गेलंय. म्हणजे सध्या तरी तो किंवा ती “रिसेप्शनिस्ट’ म्हणूनच काम करणार आहे. पोलिसी भाषेत त्यालाच “फर्स्ट कॉन्टॅक्‍ट पॉइंट’ असं म्हटलं गेलंय. पोलिसांची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी या रोबोचा उपयोग होणार आहे, असं केरळचे मुख्यमंत्री विजयन यांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या कामकाजात सर्वाधिक तंत्रज्ञान केरळमध्येच वापरलं जातं, असा दावाही त्यांनी या निमित्तानं केलाय.

अशी घटना घडली की लोकांना प्रश्‍न पडणं स्वाभाविक आहे. परंतु जे प्रश्‍न पडायला हवेत, तेच पडत नाहीत असं आम्हाला उगीचच वाटतं. किंबहुना जे प्रश्‍न पडता कामा नयेत, ते आम्हाला पडत असावेत, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं तीन वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार, माणसांचं बहुतांश काम हळूहळू रोबो हिसकावणार आहेत. रोबोटिक्‍स, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि जैव तंत्रज्ञान यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर एकेका क्षेत्रात काम करणारी माणसं हळूहळू “निवांत’ होतील. रोबोटिक क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 800 क्षेत्रांमधल्या नोकऱ्या हळूहळू कमी होत जातील आणि इतर क्षेत्रांतले कर्मचारी सुपात असतील, असं हा अहवाल सांगतो.

घाबरवून सोडणारी माहिती आहे खरी! पण ज्यानं चोच दिलीय तोच दाणाही देईल, यावर आमचा विश्‍वास आहे. उगीच कशाला चिंता करायची? रोबोटिक्‍स क्षेत्रातला गमतीचा भाग असा की, “सोफिया’ला बनवणारे डॉ. डेव्हिड हॅन्सन म्हणतात, लवकरच रोबो माणसाशी लग्न करण्यायोग्य बनू शकतील. ते बाजारातून फिरू शकतील, खरेदी-विक्री करू शकतील. सत्ता, संपत्तीचा मोह माणसाप्रमाणंच त्यांच्याही मनात उत्पन्न होऊ शकेल. तेही इस्टेट जमवतील. पण प्रश्‍न असा, की त्यावेळी रोबो कोण असेल?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)