कोल्हापूर: बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दाखवून कोल्हापूरच्या आपटेनगर येथील यशवंत सहकारी बॅंकेवरील दरोड्यातील दोघा आरोपींना जेरबंद करण्यास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. चैनी आणि पैशाच्या हव्यासासाठी यशवंत बॅंकेतच पिग्मीचे खाते असलेला विजय रामचंद्र गौड, त्याचा साथीदार राजू नेताजी सातपुते या दोघांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.
करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर रिंगरोड शाखेत लिपिकाला बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दाखवून कॅश काउंटवरुन 62 हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार 30 मे रोजी भरदुपारी तीन वाजता घडला होता. या दरोड्यानंतर मोपेडवरून आलेले दोघे संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्यांनी डोक्याला हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधल्याने तपासात अडथळे निर्माण झाले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांकडून सुरू होता. पथकाने तपासात परिसरातील दोन हजार दुचाकी फुटेजमध्ये तपासल्या. एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी तैनात केलेल्या पथकाला संशयिताने वापरलेली पांढऱ्या रंगाची मोपेड राजू सातपुते वापरत असल्याची माहिती कळाली.
बॅंकेवर टाकलेल्या दरोड्यातील पैसे वाटून घेण्यासाठी संशयित तपोवन मैदानावर येणार असल्याची माहिती पथकाला कळाली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके या ठिकाणी तैनात केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोपेडवरून गौड आणि सातपुते तपोवन मैदानात आले. साध्या वेशातील पोलिसांना पाहताच विजय गौड याने मोपेडवरून उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकातील कृष्णात पिंगळे आणि कुमार पोतदार यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बॅंक लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेली 62 हजार 110 रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.