ताथवडे गावात रस्ते, पाण्याची सोय; इतर सुविधांची वानवा

प्रतिनिधिक छायाचित्र

दीपेश सुराणा
दहा वर्षानंतरही ताथवडेला विकासाची प्रतीक्षा
काय हव्या सुविधा
-रस्ते आणि आरक्षणांचा विकास

-शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करावी
-गावासाठी स्वतंत्र दवाखान्याची सोय

पिंपरी  – महापालिकेत ताथवडे गाव समाविष्ट होऊन जवळपास दहा वर्षांचा कालावधी होत आला आहे. गाव समाविष्ट झाल्यानंतर त्याचा विकास आराखडा मंजूर होण्यासच तब्बल आठ ते नऊ वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे गावामध्ये रस्ते आणि पाण्याची सोय वगळता अन्य सुविधांची वाणवा आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता गावासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी असायला हवी. उद्यान, क्रीडांगण, मैलाशुद्धीकरण केंद्र, भाजी मंडई आदी प्रमुख सुविधांची पुर्तता होणे गरजेचे आहे.

ताथवडे गाव महापालिकेत 30 जुलै 2009 रोजी समाविष्ट झाले. गावामध्ये प्रामुख्याने ताथवडे गावठाण, पवार वस्ती, अशोकनगर, जीवननगर आदी भागांचा समावेश होतो. गावाचा विकास आराखडा 2017 आणि 2018 अशा दोन टप्प्यात मंजूर झाला. गावाला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून किवळे ते सांगवी फाटा बीआरटीएस या रस्त्याचा उल्लेख करावा लागेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाव वसलेले आहे. गावात अद्यापही 70 टक्के लोक शेती व्यवसाय करतात. त्यामुळे गावाचे गावपण टिकुन आहे. गावामध्ये नवीन गृहप्रकल्पांची कामे सध्या जोरात सुरू झाली आहेत. गावामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत.

तसेच, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावात वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. येथील जिल्हापरिषदेची शाळा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरीत झालेली नाही. गावामध्ये सध्या पवना नदीकाठी एकच घाट आहे. आणखी एक घाट विकसित करण्याची गरज आहे. अशोकनगर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याची दुरूस्ती व्हायला हवी. किवळे ते सांगवी फाटा बीआरटीएस रस्त्यादरम्यान घरे गेलेल्या नागरिकांना टीडीआर, एफएसआय अशा स्वरूपात अद्याप मोबदला मिळालेला नाही.

येथील पवना नदीपात्रात साचलेली जलपर्णी काढणे गरजेचे आहे. लोंढे वस्ती परिसरातील कचरा दररोज उचलला जायला हवा. पालिकेचा दवाखाना नसल्याने थेरगाव येथे नागरिकांना उपचारासाठी जावे लागते, अशा विविध समस्या रोहन शिंदे, मारुती पवार, निवृत्त शिक्षक पांडुरंग कदम, दत्तात्रय गुरव यांनी मांडल्या. 42.99 हेक्‍टर क्षेत्रात 46 आरक्षणे टाकली आहेत. त्यातील आत्तापर्यंत 0.40 हेक्‍टर क्षेत्राचाच ताबा मिळाला आहे. (समाप्त)

ताथवडे गावामध्ये नव्याने विकास आराखडा मंजूर झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच आरक्षित जागांचे ताबे येणे बाकी आहेत. क्रीडांगण, उद्यान, मैलाशुद्धीकरण केंद्र, भाजी मंडई आदी प्रमुख सुविधा ग्रामस्थांना दिल्या जातील. गावामध्ये प्रामुख्याने अंतर्गत आणि विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. परिसरात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याच्या स्वतंत्र टाकीचे नियोजन केले जाणार आहे.

– मयुर कलाटे, नगरसेवक

गावामध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे व्हायला हवी. तसेच, आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करणे गरजेचे आहे. सध्या असलेल्या स्मशानभूमीत सुधारणा करायला हवी. अशोकनगर भागात पाण्याची समस्या जाणवते. संबंधित ठिकाणी महापालिकेने सार्वजनिक नळ उपलब्ध करून द्यावे. अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसवावे. पेव्हींग ब्लॉकची कामे व्हायला हवी. पाण्याची स्वतंत्र टाकी, जिल्हा परिषद शाळेचे महापालिकेकडे हस्तांतर, मैलाशुद्धीकरण केंद्राची उभारणी आदी प्रमुख कामे होणे आवश्‍यक आहे.

– शेखर ओव्हाळ, माजी नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)