रस्त्यांची कामे ठेकेदारांसाठी की जनतेसाठी?

दर्जाहिन कामांमुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांचा संतप्त सवाल

सातारा – आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे लिंबखिंड ते रामनगर दरम्यानच्या रस्त्यावरही सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सातारा शहरातीलही काही रस्त्यावर रस्त्याची कामे प्रलंबित आहेत तर काही ठिकाणी ती गडबडीत उरकण्यात आली आहेत. परंतु, या कामांमध्ये संबंधित ठेकेदारांकडून रस्त्याच्या दर्जाकडे अजिबात लक्ष न दिल्याने रस्त्याची कामे जनतेच्या गैरसोयी टाळण्यासाठी सुरु आहेत की ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी, असा संतप्त सवाल वाहनधारकांसह सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होऊ लागला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह महामार्गावरील सेवा रस्ते तसेच सातारा, वाई, फलटणबरोबरच कराडसारख्या महत्वाच्या शहरांमधील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र, याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी त्या-त्यावेळी अगदी सोईस्करपणे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट घालण्यात आला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्याकडे खडीदेखील टाकण्यात आली आहे.

तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाले आहे. महामार्गापासून सातारा शहरात येणाऱ्या लिंबखिंड ते रामनगर दरम्यानच्या रस्त्यावरही त्रोटक प्रमाणात डांबर टाकून खडी अंथरण्यात आली आहे. मात्र, अवघ्या काही तासाच्या कालावधीतच या रस्त्यावरील खडी पुन्हा अनेक ठिकाणी उखडली असल्याने ठेकेदाराकडून किती दर्जेदार काम सुरु आहे हे सांगण्याची गरज नक्कीच पडणार नाही. मात्र, या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी साधे फिरकतही नसल्याने ठेकेदाराकडून मात्र दर्जाहिन काम सुरु आहेत. सध्या सुरु असलेले हे दर्जाहिन काम प्रवाशांच्या जीवावर उठत आहेत. ठेकेदारांकडून सुरु असलेल्या दर्जेहिन कामामुळे रस्त्याची कामे ही ठेकेदार पोसण्यासाठी सुरु आहेत की जनतेसाठी असा प्रश्‍न सर्वसामान्यांमध्ये पडू लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)