साकळाईच्या मार्गातील अडथळे दूर होत आहेत ; पाचपुते

चिचोंडी पाटील -साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी गेली 20 वर्षे मी पाठपुरावा करत आहे. पाण्याची उपलब्धता, विजेचा प्रश्न, लागणारा पैसा, असे अनेक प्रश्‍न आता भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात मार्गी लागत आहेत.

साकळाईच्या मार्गातील अडथळे दूर होत असल्याने साकळाई योजना स्वप्न न राहता वास्तवात येईल. खासदार डॉ. सुजय विखे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे आपल्या लढ्याला बळ मिळाले असल्याने साकळाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. पाचपुते म्हणाले, साकळाई योजनेसाठी मी गेली 20 वर्षे लढा देत आहे. यापूर्वीही साळकाईचा सर्व्हे झाला. पण अखेर पाणी उपलब्ध नसल्याचा शेरा मिळाल्याने तो विषय मागे पडला. पण आताच्या भाजपा-शिवसेना सरकारने 3 हजार 947 कोटींच्या कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला 2018 मध्ये मान्यता दिली आहे.

डिंभे धरणातील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी बोगदा करून माणिक डोहमध्ये आणण्यात येणार आहे. त्यातून अधिकचे अडीच टीएमसी पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच डिंबे ते येडगाव डाव्या काल्यातून साडेसहा टीएमसी पाणी मिळायला हवे. पण आता ते चार टीएमसीच मिळत आहे. त्याची दुरुस्ती देखभाल केल्यास आणि गळती बंद केल्यास पाणी उपलब्ध होणार आहे.

कुकडी डावा कालवा 1400 क्‍यूसेकने चालतो. तो 1800 क्‍यूसेकने चालण्यास मान्यता देण्यात आल्याने पाणी बचत होईल. त्यामुळे पूर्वीच्या सरकारने पाणी शिल्लक नसल्याचे दिलेले कारण आता संपुष्टात येत आहे. तसेच ही योजना उपसा जलसिंचन असल्याने पूर्वी विजेचा प्रश्न होता. पण ही योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने विजेची सोय होणार आहे.

सकारने बजेटमध्ये 12 हजार कोटी रुपये जलसिंचनासाठी राखून ठेवले आहेत. त्यामुळे निधीची अडचण आता राहणार नाही. तसेच ही योजना लवकरच प्रत्यक्षात येईल. या योजनेसाठी गेली 20 वर्षे मी पाठपुरावा करत आहे. पण आता या लढ्यात खासदार व नामदार विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांची साथ मिळत असल्याने माझ्या पंखांना बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)