बिहारमध्ये राजद आणि कॉंग्रेस आघाडीत तणाव 

पाटणा – बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसायला लागली आहेत. बिहारमध्ये कॉंग्रेस पक्ष कोणत्याही सहकारी पक्षावर अवलंबून नाही, असे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सदानंद सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजदने कॉंग्रेसच्या आघाडीच्या बांधिलकीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. बिहारमध्ये कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनी प्रथम या विषयाला तोंड फोडले आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. जर जागा वाटप यशस्वी झाले नाही तरी काहीही हरकत नाही. आम्ही कोणावरही अवलंबून नाही, असे सदानंद सिंह म्हणाले. उत्तर प्रदेशात कट्टर प्रतिस्पर्धी सपा – बसपाने आपल्यातील वैर बाजूला ठेवले आणि कॉंग्रेसची साथ सोडली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने एकट्यानेच निवडणूक लढवण्याचे ठरवले असल्याच्या संदर्भाने ते बोलत होते.

मात्र त्यांच्या या वक्‍तव्यावर राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनीही उत्तर दिले. कोणाविरोधात लढायचे हे कॉंग्रेसने ठरवायला हवे. भाजपचा पराभव करायचा आहे की भाजपच्या विरोधात असलेल्यांच्या विरुद्ध उभे रहायचे, हे कॉंग्रेसने ठरवावे. राजदला बिहारमध्ये सर्वात मोठा जनाधार आहे. कॉंग्रेसला राजदपासून नव्हे, तर स्वतःपासूनच धोका आहे. कॉंग्रेसला मतदारांना उत्तर द्यावे लागेल, असे तिवारी म्हणाले. कॉंग्रेस आणि राजदमध्ये बिहारमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकलेले नाही, असे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. बिहारमध्ये कॉंग्रेसने 15 जागांची मागणी केली आहे. पण राजदने केवळ 10 जागाच देऊ केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)