रिक्षाचालकांचे संपाचे हत्यार

मंगळवारपासून राज्यव्यापी बंदची हाक

पुणे – रिक्षाचालकांचे विविध प्रश्‍न आणि मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने चर्चा न केल्याने रिक्षाचालकांनी दि.9 जुलैपासून राज्यव्यापी संपाचा इशारा ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्‍त कृती समितीने पत्रकार परिषदेत दिला. यावेळी संघटनेचे बाबा कांबळे, अशोक साळेकर, प्रदीप भागवत, बापु धुमाळ, दत्ता पाटील, अशोक खानोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रिक्षाचे मुक्‍त परवाने बंद करावे, परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, हकीम कमिटीच्या सूत्रानुसार रिक्षाची 3 वर्षे रखडलेली भाडेवाड करण्यात यावी, रिक्षा इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करण्यात यावे, रात्रीचे दीडपट भाडे सुरू करा, रिक्षा स्टॅन्डची संख्या वाढविण्यात यावी, रिक्षाचालकांचे शासकीय ऍप तयार करण्यात यावे आदी मागण्यांसाठी प्रशासनाने रिक्षा चालकांशी 30 जूनपर्यंत चर्चा करावी. चर्चा न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा समितीच्या वतीने मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात देण्यात आला होता.

मात्र, 30 जूनची तारीख उलटून देखील शासनाने चर्चा केली नाही. त्यामुळे राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे, असे परिषदेत नमूद करण्यात आले.
“आम्ही पुकारणार असणारा संप सरकारने आमच्यावर लादला असून नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला सरकार जबाबदार आहे,’ असे मत अशोक साळेकर यांनी व्यक्‍त केले. या संपामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 20 लाख रिक्षाचालक मालक सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here