दोन नवे चेंडू वापरल्याने रिव्हर्स स्विंग संपुष्टात -उमेश यादव 

मलाहिदे: आयसीसीच्या नव्या नियमानुसार दोन नव्या चेंडूंना सचिन तेंडुलकरने केलेला विरोध ताजा असतानाच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही या नियमावर टीका केली असून दोन नवे चेंडू वापरल्याने रिव्हर्स स्विंग संपुष्टात आल्याची स्पष्टोक्‍ती करतानाच गोलंदाजांचे महत्त्वाचे कौशल्य मारले गेल्याचेही त्याने म्हटले आहे.
आयसीसीने ऑक्‍टोबर 2011 मध्ये दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यास प्रारंभ केला. मात्र आयसीसीच्या या निर्णयावर तेंव्हापासून अनेक संघांनी व खेळाडूंनी टीका केली आहे. आयसीसीच्या या नियमाचा फलंदाजांना सर्वाधिक फायदा होत असून गोलंदाजांवर निर्बंध लादले गेले आहेत, असेही अनेक खेळाडूंनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघांकडून मोठी धावसंख्या उभारली गेल्यामुळे या नियमाबद्दलच्या चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले आहे.
इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात 6 बाद 481 धावा केल्या. वनडे सामन्यांच्या इतिहासातली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यानंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 बाद 312 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडने 44.4 षटकांतच पूर्ण केले. त्यानिमित्ताने या नियमाची चर्चा पुन्हा नव्याने रंगली आहे. तत्पूर्वी, सचिन तेंडुलकरने या नियमाला विरोध केला होता. तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसनेही सचिनची बाजू घेत याच कारणामुळे क्रिकेटमध्ये नवे जलदगती गोलंदाज तयार होत नाहीत असे म्हटले आहे.
उमेश यादवने सांगितले की, इंग्लंडमध्ये दोन नवे चेंडू वापरल्यास गोलंदाजांना अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांना रोखण्यात अपयश येईल, चेंडू जुना झाल्यानंतरच रिव्हर्स स्विंग करता येतो. मात्र दोन बाजूंनी वेगळे चेंडू वापरल्यास आम्हाला रिव्हर्स स्विंग करताच येणार नाही. वन डे सामन्यात चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. डेथ ओव्हर्समध्येही आम्ही रिव्हर्स स्विंग पाहिलेला नाही. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीनेही ही बाब मान्य केली आहे धावपट्टी निर्जीव असल्याने दोन नवे चेंडू हे गोलंदाजांसाठी आव्हानच ठरणार आहे.
उमेश यादवच्या नावे अजब विक्रमाची नोंद 
उमेश यादव हा भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील एक महत्वाचा गोलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली. परंतु पहिल्या टी20 सामन्यात उमेशला संधी मिळू शकली नाही. दुसऱ्या सामन्यात उमेश यादवला संधी मिळाली व त्याच्या नावावर एक वेगळाच विक्रम जमा झाला.
उमेश यादव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन टी20 सामन्यांत सर्वाधिक अंतर राखलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. 30 वर्षीय उमेश यादवने या आधी 7 ऑगस्ट 2012 रोजी अखेरचा टी 20 सामना खेळला होता. त्यांनतर तब्बल 6 वर्षांनी त्याला भारताकडून टी20 सामना खेळण्याची संधी लाभली. या दरम्यान उमेश यादवला तब्बल 65 सामन्यांना मुकावे लागले. या कामगिरीबरोबरच उमेशने दिनेश कार्तिकचा विक्रम मोडीत काढला आहे. दिनेश कार्तिकला 56 सामन्यांनंतर संघात स्थान मिळाले होते
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)