सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर  : मराठा आरक्षण कायद्याच्या सर्व कसोटीवर खरे उतरेल, यासाठी सर्वोच्च न्यायालयात निष्णांत कायदे तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना सुरु केल्या आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या निर्णय प्रक्रियेत सक्रीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा सकल मराठा समाज कोल्हापूरच्यावतीने येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालकमंत्री पाटील म्हणाले, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास राहिलेल्या मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत दाखल होणाऱ्या याचिकावेळी समाजाला दिलेले आक्षरण कायद्याच्या कसोटीवर खरे ठरण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात कायदे तज्ज्ञांची फौज उभी करेल, असे पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातही राज्य शासन व सकल मराठा समाजाला टीम वर्क करावे लागेल.

पालकमंत्री पाटील म्हणाले, या आरक्षणामुळे मराठा समाजातील मुलांना नोकरी व शिक्षणात याचा लाभ होणार आहे. मात्र केवळ नोकरीसाठी आरक्षण यावर विसंबून न राहता मराठा सामाजासाठी असणाऱ्या शासनाच्या सर्व योजना सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात पोहोचविल्या पाहिजेत. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी प्रो ॲक्टीवपणे काम करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.

शासनाच्या सर्व योजनांची माहिती सकल मराठा समाजाला व्हावी व त्याचा फायदा समाजाला व्हावा यासाठी गावपातळीवर मराठा केंद्रे कार्यरत होणे आवश्यक आहे. सकल मराठा मोर्चा, आंदोलनाच्या प्रसंगी पाच लाखापेक्षा कमी नुकसान झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही सुरु झाली असून पाच लाखापेक्षा वरील नुकसान झालेल्या गुन्ह्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण, नोकरी निमित्त शहरात येणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी कोल्हापूर येथे मराठा भवन उभारणीस आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री  पाटील यांनी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा आपण आनंदोत्सव साजरा करत असताना या पुढे समाजहिताची मोठी कामे करावी लागणार याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजचे असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)