ऑलिम्पिकसाठी आशियाई स्पर्धेतून माघार – मेरी कोम

नवी दिल्ली: एम. सी. मेरी कोम हिने पुढील महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेतून माघार घेतली असल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला असून मेरी कोमने या बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, ऑलिम्पिकसाठी नव्या वजनी गटातून पात्र ठरणे कठीण असून मी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे.

गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत मेरी कोमने सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली. आता रशिया येथे सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याचे उद्दिष्ट मेरीने बाळगले आहे. या विषयी बोलताना ती म्हणाली की, हे वर्ष माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणे हेच सध्या माझे एकमेव ध्येय आहे. कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाले तर मला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता येणार नाही. मेरी कोम लढणाऱ्या 48 किलो वजनी गटाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्याने तिला 51 किलो वजनी गटात लढावे लागत आहे. मेरी कोमने अलीकडेच जर्मनीमध्ये जाऊन सराव केला. त्यातच 51 किलो वजनी गटात बलाढय प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यावर मात करण्यासाठी मी सध्या कसून सराव करत आहे, असे म्हणत मेरीने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली, इंडिया खुली बॉक्‍सिंग स्पर्धा ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता निवडक स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. योग्य नियोजनाशिवाय हे शक्‍य होणार नाही. वर्षभरापासून मी 51 किलो वजनी गटाचा सराव करीत आहे. तंदुरुस्तीचा प्रश्‍न सोडल्यास माझ्या खेळाबाबत कसलीही चिंता नाही. माझी ताकद, शक्ती आणि ऊर्जा वाढविण्याचा मी प्रयत्न करत आहे. सध्या मी ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले असल्याने निवृत्तीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. मात्र निवृत्तीनंतर मी पूर्णवेळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेन. देशातील महिलांच्या बॉक्‍सिंगचा स्तर उंचावायचा असल्यास, जर भारतीय बॉक्‍सिंग महासंघ किंवा सरकारला माझी गरज भासल्यास, मी सदैव उपलब्ध असेन. असेही तिने यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)