रेठरे बुद्रुकला फिल्मी स्टाईल बालक अपहरणाचे नाट्य

पोलिसांनी दोन तासातच लावला छडा

वाठार – रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे शुक्रवार, दि. 29 मार्च रोजी बालक अपहरण घटनेने खळबळ उडवून दिली. आजीनेच नातवाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन अवघ्या दोन तासातच या घटनेचा छडा लावला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे कॅनॉल चौकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणारा प्रथमेश विशाल बनसोडे (वय 7 वर्षे) हा शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यावर रेठरे बुद्रुक रस्त्यातून चालत निघाला होता. यावेळी रिक्षातून आलेल्या महिलेने त्याला पळवून नेल्याचे त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी नातेवाईकांना सांगितले. ही वार्ता गावात पसरताच मुलाच्या अपहरणाची चर्चा सुरु झाली. दरम्यान, रेठरे गावात आज निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कराड तालुका पोलिसांचे संचलन सुरु होते. या अपहरणाची माहिती पोलिसांना समजताच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर, सपोनि माळी, भापकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ हालचाली केल्या.

यावेळी चौकशीत सदर मुलाची आजी सुनीता सुभाष वाघमारे (वय 55) रा. वडोली निळेश्वर सध्या रा. मुंबई हिने सदर मुलास परस्पर रिक्षातून घेऊन गेले असल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी बालकाचे अपहरण हा विषय गांभिर्याने घेऊन ताबडतोब फिल्डिंग लावून या घटनेचा अवघ्या दोन तासातच शोध लावला. याबद्दल परिसरातून पोलिसांच्या कार्यकुशलतेबद्दल कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)