‘हाऊज द जोश’चा प्रतिसाद स्थानिकास की उपऱ्यास

राष्ट्रवादीला अंतर्गत बंडाळीसह विरोधी पक्षांचाही करावा लागणार सामना

प्रकाश राजेघाटगे

बुध  – सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी या हिंदी चित्रपटाने सध्या बॉंक्‍स ऑफीसवर धुमाकुळ घातला आहे. यातील हाऊज द जोश या संवादाने राजकारणी मंडळींना भुरळ पाडली आहे. याच पार्श्‍वभूमीवर लोकसभेच्या तोंडावर कोरेगांव तालुक्‍याच्या विधानसभेचा जोश पडताळून पाहिला असता भलतेच निष्कर्ष हाती येत आहेत. राष्ट्रवादीचा भक्कम किल्ला असलेल्या या मतदारसंघात सध्या भाजपनेही ताकद वाढवली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळी व विरोधी पक्षांचा सामना करताना विद्यमान आमदारांची कसोटी लागणार आहे.

खा. शरद पवार यांच्यापाठीमागे कोरेगांव मतदारसंघ ठाम उभा राहिला आहे. साहेबांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवत जनतेने डॉ. शालिनीताई पाटील या तगड्या उमेदवाराचा पराभव करुन शशिकांत शिंदे बाहेरच्या उमेदवाराला निवडून दिले. आ. शिंदेनी सुरुवातीला सर्व घटकांना बरोबर घेऊन कारभारास सुरुवात केली. खेडचे भास्कर कदम व बाळासाहेब सोळस्कर यांच्यासारखे सामान्य कार्यकर्ते सत्तासोपानावर आरुढ झाले. पण प्रस्थापित राजकारणी दुखावले गेले. 2014च्या विधानसभेत महायुती भंगली व विद्यमान आमदारांना सत्तेचा मार्ग सोपा झाला. 2014ला महायुती अभंग राहिली असती तर स्थानिक विरुध्द बाहेरचा असाच प्रचार झाला असता. पण 2014च्या निवडणुकीत भाजपा सत्तेवर आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी लक्ष दिले. पुरुषोत्तम जाधव, अतुल भोसले, महेश शिंदे, अमित कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेत्यांचा प्रवेश भाजपामध्ये झाला. याचेच फलित म्हणजे भाजपाने जिल्हा परिषदेत चंचूप्रवेश केला.

कोरेगांव विधानसभेसाठी महेश शिंदे हे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले. (माहुलीचे संतोष जाधव व दुधीचे यशवंतभाऊंची भाजपा उमेदवार म्हणून अधूनमधून वावडी उठतात.) दुष्काळी भागात कारखाना काढणारे महेश शिंदे कोरेगांव विधानसभेचे उमेदवार म्हणून कामाला लागलेत. तालुक्‍याच्या उत्तर भागातील काही ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकावून आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना ते कडवी झुंज देऊ शकतात, हे त्यांनी सिध्द केले आहे.

पक्षातंर्गत विरोधकांना ते कसे बरोबर घेतात, यावरच त्यांचे गणित अवलंबून आहे. तालुक्‍यात प्रस्थापितांच्या विरोधात कायम विरोध करणारा एक गट म्हणजे शिवसेना. 1982 मध्ये जिल्ह्याप्रमाणे शिवसेना कोरेगांव तालुक्‍यातही रुजली, याचे श्रेय जाते ते श्रीकांत पंडीत, मधुकर नाईक, विश्‍वासराव बर्गे आदींना. त्यांच्या विचारांचा वर्तमानातील आवाज उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव झाले आहेत. युती-शासन काळात शिवसेनाप्रमुखांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेसाठी जिहे-कठापूर योजना अमंलात आणली.

(चार महिन्यांपूर्वी खटावात या योजनेचे बारसे लक्ष्मणराव इनामदार योजना असे केले असताना सेनेचे पालकमंत्री व त्याच खात्याचे मंत्री असणारे बापू व नव्याने कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष बनलेले उपनेते गप्प होते हे विशेष). जिहे-कठापूर योजनेसाठी प्रताप जाधव यांनी केलेला संघर्ष संपूर्ण दुष्काळी पट्टा जाणून आहे. हाच दुष्काळी जनतेचा आवडीचा विषय घेऊन प्रताप जाधव राजकीय पट्टा कोरेगांव विधानसभेसाठी आजमावत आहेत. मनसेतून शिवसेनेत आलेले व युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले हेही शिवसेना उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. पण त्यांच्याविषयी शिवसेनेच्या मुंबईतील एका बड्या नेत्यास विचारले असता त्यांनी कोरेगांवात मावळ पटर्न (मुळशी नव्हे) राबवणार आहोत, असे विनोदाने सांगितले.

2009मध्ये इच्छुक असलेले श्रीरंग बारणे यांना 2014 ला संधी दिली, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. भाजपा-सेना युती झाल्यास विद्यमान आमदारांना निवडणूक अवघड जाणार आहे. युती झाल्यास मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपा नेते काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. नगराध्यक्ष व आमदारांमधील बेबनाव लक्षात घेता निवडणूक स्थानिक विरुध्द उपरा उमेदवार अशीच होईल. विरोधी पक्षात फक्त प्रताप जाधव हेच स्थानिक उमेदवार म्हणून गणले जातील. (उमेदवारी मिळाल्यास) निवडणुका तर्कापेक्षा कार्यकत्यांच्या ताकदीवर लढवल्याला जातात. हाऊज द जोश? अशी साद घातल्यावर कोणाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला प्रतिसाद देतात यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

दिवंगत लक्ष्मणतात्यांच्या माघारीही खत्रीचा गटाची ताकद

कोरेगांव तालुक्‍याच्या राजकारणातील आणखी एक गट म्हणजे खा. लक्ष्मणराव पाटील यांना मानणारा राष्ट्रवादी पक्षातंर्गत गट. दिवंगत तात्यांच्या माघारीही हा गट ताकद राखून आहे. 2017च्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आमदार विरुध्द तात्या गट यांचा संघर्ष टोकाला गेला होता. त्याचा प्रत्यय एकंबे पंचायत समिती गणात आला. राष्ट्रवादीची घौडदौड जोरात सुरू असताना एकंबे गणात राष्ट्रवादीचे ऍड. विजयसिंह शिंदे (तात्या समर्थक) यांचा पराभव आमदारांनीच केला, असा समज मानून सुनिल खत्री यांच्या नेतृत्वाखाली खासदार गट (भिशी गट) कार्यरत आहे. हाच गट विद्यमान आमदारांना अडचणीत आणू शकतो, असे खासगीत बोलले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)