सैनिकांप्रती आदर राखा : खा. उदयनराजे

कराडात हजारोंच्या उपस्थितीत शहिदांना श्रध्दांजली,

कराडच्या नगराध्यक्षा गैरहजर…
कराडच्या प्रीतिसंगम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शहीद जवानांच्या श्रध्दांजलीसाठी सर्वपक्षीय मान्यवरांना संयोजकांनी आमंत्रित केले होते. शहीदांप्रति सहवेदना प्रकट करण्यासारख्या कार्यक्रमास कराड पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. मात्र, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे गैरहजर होत्या. ही बाब उपस्थितांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गैरहजेरीबद्दल उपस्थितांत कुजबुज होती.

कराड – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने येथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच आतापर्यंत शहीद झालेल्या जिल्ह्यातील 127 जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. खा. उदयनराजे यांनी आपला वाढदिवस शहिद जवानांना समर्पित करून जवानांप्रती सहवेदना प्रकट केल्या. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले उपस्थित होत्या.

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली व सातारा जिल्ह्यातील 127 शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात रविवारी (दि. 24) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, जि. प. चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सातारच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कार्यक्रमाचे संयोजक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, संग्राम बर्गे, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मान्यवर, शहिद जवानांचे कुटुंबीय, महिला, युवती, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा. उदयनराजे म्हणाले, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सैनिकांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. एक दिवस सीमेवर जाऊन पहा, म्हणजे सैनिकांचा त्याग आणि शौर्य काय असते ते कळेल. सैनिकांचा विशिष्ट घटनांपुरता सन्मान, आदर न करता त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, ही भावना कायम मनात ठेवून त्यांचा नेहमी आदर राखला पाहिजे. मी सर्वसामान्यांबरोबरच सैनिकांच्याही पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. संयोजक राजेंद्रसिंह यादव यांनी शहिदांच्या शौर्यगाथावर श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेल्या भावना सांगून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या 44 जवानांच्या बदल्यात देशातील 44 हजार सैनिक त्यांच्या जागी लढण्यासाठी देशसेवेत सज्ज असल्याचे नमूद केले. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या आम्ही सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी दत्तात्रय गणपती कदम यांच्या मातोश्री काशीबाई गणपती कदम तसेच 26/11 हल्ल्यातील शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबाळे यांच्या कुटुंबाचा खा. उदयनराजे भोसले, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव नगरसेवक हणमंतराव पवार, सुनील काटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या मानपत्राची ध्वनिफीत ऐकविण्यात आली.

प्रारंभी छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर लष्करी बॅंड पथक, पोलीस बॅंड पथक आणि सातारा येथील सैनिक स्कूलच्या बॅंड पथकाने देशभक्तीपर गीतांच्या ध्वनी वाजविल्या. यावेळी विविध हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या सातारा जिल्ह्यातील 127 जवानांच्या कुटुंबियांचा मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर एकांडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)