विरोधक लढण्याआधीच शरणागत?

– विदुला देशपांडे

उत्तर मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचे उत्तरेकडचे प्रवेशद्वार. दहिसरपासून या मतदारसंघाला सुरुवात होते. मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीयांचे वास्तव असलेल्या या मतदारसंघात आदिवासी बांधवांचे अस्तित्वही पाहण्यास मिळते. मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क हे याच मतदारसंघात आहे. याच नॅशनल पार्कजवळ मुंबईपासून हाकेच्या अंतरावर परंतु सुविधापासून खूप दूर असलेले आदिवासी पाडे पाहायला मिळतात. मूलभूत सुविधांपासून दूर असलेला हा आदिवासी अशिक्षित असल्याने आपल्या हक्कासाठी आवाज उठवतानाही दिसत नाही. गेल्या काही वर्षात उत्तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. मोकळ्या जागेवर उंचच उंच इमारती उभा राहिलेल्या दिसतात. चारकोप, गोराई या म्हाडाच्या वसाहतींबरोबरच आता नव्याने म्हाडाच्या इमारती उभ्या राहात आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच आहे हे इतके ठरून गेले आहे की सध्या या मतदारसंघातून कोणीही महत्त्वाचा विरोधी पक्ष निवडणूक लढवायला तयार नाही. म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेस यांच्यापैकी इथे कुणी निवडणूक लढवायला तयार नाही. मोठे पक्ष सोडाच पण समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसारखे स्वत:चा ठसा उमटवू पाहणारे पक्षही या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार नाहीत, इतकी भाजपची या मतदारसंघावर पकड घट्ट आहे.

या मतदारसंघात मालाड ते बोरिवली हा भाग येतो. सध्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल असलेले आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हे या मतदारसंघातून निवडून आले होते. आता 2014मध्ये गोपाळ शेट्टी हे भाजपचे उमेदवार उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. शेट्टींची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की विरोधी पक्षांतील कोणताच बडा नेता हात दाखवून अवलक्षण करू इच्छित नाही.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 17 लाखाहून अधिक मतदार आहेत. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय समाज इथे राहतो. मराठी लोकांबरोबरच गुजराथी, मारवाडी आणि उत्तर भारतीयांची संख्याही इथे लक्षणीय आहे आणि भाजपची सगळी मदार त्यांच्यावरच अधिक करून आहे.

अर्थात आज जरी या मतदारसंघात भाजपला टक्कर द्यायला कुणी धजावत नसले तरी 2004 आणि 2009मध्ये इथे कॉंग्रेसचे खासदार निवडून आले होते. 2004मध्ये अभिनेता गोविंदा यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्या वर्षी ते निवडून आले. पण खासदार म्हणून त्यांची कारकीर्द निराशाजनक होतीच पण वादग्रस्तही होती. नंतर गोविंदानेही राजकारणाचा नाद सोडला आणि मग 2009मध्ये संजय निरूपम यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली. 2009च्या निवडणुकीपर्यंत राज ठाकरे यांच्या मनसेचा उदय झाला होता आणि या पक्षाकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मनसेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा फटका भाजपला बसला. त्याच्या मतांची विभागणी झाल्याने कॉंग्रेसला फायदा मिळाला आणि त्या पक्षाचे संजय निरूपम खासदार झाले.

गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबईतील भाजपचे सध्याचे खासदार आहेत. गेल्या वर्षी शेट्टींनी ख्रिस्ती लोकांबद्दल केलेले वक्‍तव्य वादग्रस्त ठरले. त्यांनी मतदारसंघातील काही खुल्या जागांवर व्यापाऱ्यांना अतिक्रमण करू दिले म्हणूनही त्यांच्यावर आरोप केला जातो. या मतदारसंघातील ख्रिस्ती मतदार त्यांच्यावर नाराज आहेत, असे काहींना वाटते. पण शेट्टींना तसे वाटत नाही. खासदार म्हणून आपण कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण गेल्या पाच वर्षांत लोकसभेत 100 टक्के उपस्थित होतो आणि लोकांबरोबरही 100 टक्के यशस्वी ठरलो असा त्यांचा दावा आहे. उत्तर मुंबई क्षेत्रात शेट्टी गेली 28 वर्षे कार्यरत आहेत. भाजपच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. महानगरपालिकेतही त्यांच्या मतदारसंघातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले याचीही ते आठवण करून देतात.

शेट्टी यांची वादग्रस्त भाषणे अधूनमधून प्रसिद्ध होत असतात, त्यावरून वादंगही माजते. पण त्यांच्या संपर्काचे जाळे, कार्यकर्त्यांची संख्या आणि नियोजन या जोरावर ते या मतदारसंघात चांगलीच बाजी मारू शकतात. याबद्दल वाद नाही.

भाजपच्या उमेदवारांची यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही. पण उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्या व्यतिरीक्त अन्य कुणाला उमेदवारी मिळेल अशी शक्‍यता नाही. अर्थात शेट्टी यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची हे कॉंग्रेसचे ठरत नसले तरी कॉंग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसच्या प्रवीण छेडा, भूषण पाटील, उपेंद्र जोशी यांची नावे चर्चेत आहेत.

शेट्टी यांनी गुजराती-मारवाडी लोकांची एकगठ्ठा म्हणावी अशी मते मिळतील, पण मराठी मतदार त्यांच्यावर नाराज आहेत असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. गोपाळ शेट्टी हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपासून राजकारणात सक्रीय झाले. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या तीनही प्रकारच्या निवडणुका ते लढले आणि कुठेही पराभूत झालेले नाहीत. त्यांच्या कामाचा झपाटाही मोठा आहे. बोरिवली, कांदिवलीत रस्त्यांना जोडणाऱ्या चौकांचे सुशोभिकरण त्यांनी केले. त्याचबरोबर खुली मैदानांची त्यांनी जपणूक केली. आपल्या मतदारसंघातील मूलभूत सुविधांवर त्यांनी त्यांच्या निधीतील बराचसा पैसा खर्च केला आहे. शौचालये, जिमखाने, जॉगिंग ट्रॅक वगैरेकरिता त्यांनी बराच पैसा खर्च केला आहेत. लोकसभेतही त्यांची 100 टक्के उपस्थिती होती आणि लोकसभेच्या कामकाजात ते सक्रीय भागही घेत असत. पण तितकेच ते वादग्रस्तही आहेत. ख्रिस्ती लोकांना इंग्रज म्हणून हिणवणे असो वा इथे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पात हस्तक्षेप केला म्हणून तर कधी तलाव बुजवून उद्यान बांधले म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप झाले, टीका झाली आरोपही झाले. पण त्यांच्यामागे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)