रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदर वाढीमुळे समस्त उद्योगक्षेत्र नाराज 

 मंदी रेंगाळण्याची शक्‍यता 
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी रेपोदर पाव टक्‍क्‍यानी वाढवून 6.5 टक्‍के केला आहे. त्याचबरोबर रिव्हर्स रेपोदर पाव टक्‍क्‍यानी वाढवून तो 6.25 टक्‍के केला आहे. विविध क्षेत्राची उत्पादकता बऱ्याच कालावधीनंतर वाढत असताना बॅंकेने आणखी काही काळ थांबण्याची गरज होती असे उद्योजकांनी सूचित केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. जागतिक परिस्थिती तर खराब होतीच त्याचबरोबर नोटाबंदीमुळे मोठ्या आणि छोट्या उद्योगांच्या भांडवल सुलभतेवर परिणाम झाला होता. त्यानंतर उद्योगांना जीएसटीशी जुळवून घ्यावे लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात उत्पादकतेवर आणि रोजगार निर्मितीवर परिणाम झाला होता. आता तीन महिन्यापासून विविध क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. कालच पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. मात्र, आता रिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यातच व्याजदरात पुन्हा पाव टक्‍क्‍यानी वाढ केली आहे. त्यामुळे भांडवलाचा वापर कमी होण्याची शक्‍यता असल्याचे उद्योजकांच्या संघटनाना वाटते.
गेल्या दोन वर्षापासून विकासदर कमी झाला होता. त्यामुळे तो आता वाढेल असे रिझर्व्ह बॅंकेने गृहीत धरू नये. त्यासाठी पूरक धोरण राबविण्याची गरज असल्याचे असोचेम या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष संदीप जजोडिया यानी सांगितले. ते म्हणाले की, सरकारने खर्च वाढविला आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्रालाही भांडवल मिळाले तर विकासदर वाढण्यास मदत होणार आहे.
दोन महिन्यात दोन वेळा व्याजदरात वाढ केल्यानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यानंतर व्याजदरात वाढ करण्याची गरज कमी असल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल जजोडिया यांनी समाधान व्यक्त केले. जजोडिया यांनी सांगितले की, बॅंकांचे आरोग्य चांगले नाही. त्याचबरोबर उद्योगावरील दडपण आणखी कमी झालेले नाही. त्यामुळे पतधोरण काही काळ शिथिल ठेवण्याची गरज होती.
महिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष बिश्‍नोई यांनी सांगितले, की खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. आता व्याजदरात वाढ झाल्यामुळे उद्योगांना इतर माध्यमातून भांडवल उभारणीकडे वळावे लागणार असल्याचे त्यानी सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)