शिक्षण : संशोधनावर आधारित शिक्षण पध्दती गरजेची…

-प्रा.डाॅ. संजय चाकणे

शिक्षणामध्ये नव्याने सध्या खूप गोष्टी घडलेल्या आहेत. उच्च शिक्षणामध्ये उच्चस्तर शिक्षणाची घोषणा झालेली आहे. आणि त्यात बदल होणे अपेक्षित आहे. आपण गेल्या 70 वर्षात अनेक प्रयोग केले. खरं तर शिक्षण हे क्षेत्र प्रयोग करण्याचं नव्हे. विचारांती विचार करून एकदा निर्णय झाला की तो अमलात आणायचाच असा प्रकार व्हायला हवा होता. तो काही अंशी झालेला दिसत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याची शिक्षणव्यवस्था नक्‍की कोणत्या वळणावर आहे, हे तपासावे लागणार आहे. आता शिपाई पदासाठी जेव्हा पदवी झालेले नव्हे तर पदव्युत्तर झालेले अगदी विद्यावाचस्पती झालेले लोकसुद्धा मुलाखतीसाठी येतात, तेव्हा कुठेतरी भीती वाटायला लागते. आणि म्हणूनच आता आपण सगळयांनी मिळून या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला हवेत. याला एकट्या कोणालाही दोष देऊन चालणार नाही. दोष आहे तो संपूर्ण शिक्षण यंत्रणेचा. मुळात शिक्षणावरचा जो आपला खर्च आहे तो अतिशय तुटपुंजा आहे. “10 प्लस 2 प्लस 3′ ची सिस्टीम या निमित्ताने बरोबर की चूक याचाही उहापोह होण्याची आवश्‍यकता वाटायला लागली आहे.

वास्तविक लहानपणापासूनच्या शिक्षणावर जास्त भर द्यायला हवा. आपल्याकडे कट पेस्ट टेक्‍नालॉजी आलेली आहे वास्तविक थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रात्यक्षिकांच्या ज्ञानावर भर द्यायला हवा. असं प्रत्येक जण म्हणतो पण वेळ आल्यावर मात्र तसं केलं जात नाही. जी प्रात्यक्षिक केली जातात दहावी आणि बारावी पर्यंतची जर प्रात्यक्षिक बघितली तर असं लक्षात येतं की उरकायची म्हणून ती उरकली जातात. मग आपल्याकडे पॅटर्न येत गेले. लातूर पॅटर्न असेल किंवा आणखीन कोटा पॅटर्न आता आलेला आहे. या पॅटर्नमुळे मुलं नीट किंवा जेईई या परीक्षेत अतिशय चांगल्या मार्काने पासही होत असतील. परंतु त्यांच प्रक्‍टीकल नॉलेज आहे ज्ञान आहे ते मात्र अत्यंत तुटपुंज राहतं आणि म्हणून ही मुलं पुढे खूपच कमी पडतात.
बारावीच्या निकालाची टक्‍केवारी 90 ते 100 टक्‍यांच्या दरम्यान राहते.

शाळा अतिशय उत्साहाने सांगतात की, आमचा निकाल 100 टक्के लागला म्हणून मग हीच मुलं जेव्हा प्रथम वर्षाला मग ती अभियांत्रिकेला किंवा फार्मसी किंवा कला, विज्ञान, वाणिज्य शाखांमध्ये प्रवेशित होतात आणि प्रथम वर्षाचा निकाल जेव्हा लागतो तो निकाल मागील पाच वर्षाची परंपरा पाहिली तर हा निकाल 15 ते 30 टक्‍याच्या दरम्यान राहतो. तसेच एटीकेटीसहीत निकाल 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत लागतो. ही सर्व दुरवस्था आहे. मग ही अवस्था अशी का होते याचं कारण तर बेसीक अतिशय कच्ची राहतात. विशेषत: विज्ञानाच्या बाबतीत मुलांना विद्यार्थ्यांना लहान लहान गोष्टीसुद्धा धडपणे मांडता येत नाहीत.

याही पलीकडे इंगजी माध्यमातून ज्या पिढया आता येऊ लागल्या आहेत त्यांना ना नीट इंग्रजी येतं ना मराठी! त्यामुळे ती कुठेच चांगली राहत नाहीत. नॉलेज म्हणून ज्ञान म्हणून ती मागेच पडत राहतात. यावर तोडगा म्हणजे संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे. ही शिक्षण पद्धती काय आहे तर शिकवणे म्हणजे सोपस्कार झाला आहे. बोलणे, बोलावणे आणि बोलणे असेच घडत राहते. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना दिली जात नाही. प्रश्‍न पडले पाहिजेत विशेषतः का? केव्हा? कुठे? कसे? कधी? कशासाठी? या प्रश्‍नानी विद्यार्थ्यांच्या मनात घर केले पाहिजे? तर आणि तरच जिज्ञासा जागृत होईल.

वास्तविक शिकवताना या हृदयीचे त्या हृदयी पोहोचले पाहिजे. पण हल्ली शिकवणे हे एकतर्फ़ी झाले आहे. जोपर्यंत फक्‍त शिकवण्यापेक्षा शिकायला भाग पाडले जात नाही तोपर्यंत अध्ययन-अध्यापन पद्धतीत बदल होणार नाही. वर्गातील चार पोरांनी प्रश्‍न विचारल्यावर हात वर केल्यावर त्यांना कळाले म्हणजे वर्गाला कळाले, असे शिकवणाऱ्याला वाटत राहते. म्हणूनच शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे झाले आहे.

संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब शाळा पातळीपासून करावा लागेल. वानगी दाखल एखादा प्रयोग विद्यार्थ्याला शिकवायाचा असेल किवा एखादा विषय शिकवायचा असेल तर त्या विषयाचा संबंध दैनंदिन जीवनामधे किवा जगण्यासाठी लागणाऱ्या व्यवहाराशी कसा आहे, याची सांगड घालायला भाग पाडणे म्हणजे खूप मोठ्या किंवा चकचकित प्रयोगशाळेत केलेले प्रयोग नसून शेती व्यवसायात शेतकऱ्याला कष्ट कमी करण्यासाठी कामगाराला किंवा भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी केलेले प्रयोग दैनंदिन व्यवहार करताना सहज सुलभता आणणे म्हणजे संशोधन.

गुरुत्वाकर्षणाचा प्रयोग शिकवायचा असेल तर प्रत्येकवेळी चकचकित उपकरणे न घेता एखाद्या छोट्या फळाला दोरी बांधून त्याला दोलायमान करून गुरुत्वाची किंमत सहजी काढता येईल. शिवाय विद्यार्थ्याला हा माझा प्रयोग म्हणून ममत्वाची भावना निर्माण करता येईल.

संशोधन शब्द खूप मोठा वाटला तरी छोट्या गोष्टीमधून विद्यार्थ्यांना ते पोहचवता येऊ शकते. लहानपणीच ही वृत्ती तयार झाली तर मोठे संशोधक नक्‍की तयार होतील. संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अन्यथा भावी पिढ्यांचे अतोनात नुकसान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)