सातारा – खटाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जमिनीतील पाण्याची पातळी व पीकांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून गाव निहाय अहवाल येत्या रविवारपर्यंत सादर करा, अशा सूचना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा दुष्काळ नियोजन आढावा बैठक सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी माण, खटाव, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यातील टंचाई परिस्थतीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला अहवाल तात्काळ शासनाकडे सादर केला जाईल, असे सांगून सहपालकमंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, टंचाईबाबत तालुक्याचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची संयुक्त तालुका निहाय बैठक घ्या, अशा सूचना करुन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, टंचाईच्या काळात पाण्याच्या उपाययोजनेसाठी 50 लाखापर्यंतची कामे जिल्हा परिषदेने घ्यावी. आता जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे.
भविष्यात चारा टंचाई होणार नाही यासाठी आत्तापासूनच नियोजन करा. पिण्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ज्या गावातून टॅंकरची मागणी येईल त्या गावाला तात्काळ टॅंकर उपलब्ध करुन द्या, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
खटाव तालुक्यातील पाण्याची उपलब्धता, पिक परिस्थितीची माहिती शासनाकडे जाणे महत्वाचे असल्याने खटाव तालुक्यातील मंडलातील गाव निहाय सर्वे करुन परिस्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करा, अशा सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी या बैठकीत केल्या. जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे शेतकऱ्यांना बियाणे देऊन चारा निर्मिती करण्यात येणार. उरमोडीचे पाणी कालव्याने खटावला देण्यात येत आहे.
हे कालवे कुणी फोडणार नाहीत यासाठी संबंधित विभागाने गस्त घालावी. माण व खटाव तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करा. लोकांच्या ज्या मागण्या येतात याच्या नोंदी रजिस्टर मध्ये करा. टॅंकर मागणीबाबत तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा