विखे पाटील प्रकरणाची हिमाचलात पुनरावृत्ती

सिमला -महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कुटूंबीयांशी संबंधित राजकीय घडामोडींची उलट पद्धतीने पुनरावृत्ती हिमाचल प्रदेशात झाली आहे. हिमाचलमधील भाजपचे मंत्री असणाऱ्या अनिल शर्मा यांचे पुत्र आश्रय यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यानंतर मुलाच्या विरोधात प्रचार न करण्याची भूमिका शर्मा यांनी घेतली आहे.

अनिल शर्मा हे माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र आहेत. सुखराम यांनी नुकतीच घरवापसी करताना कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत त्यांचे नातू आश्रयही कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. त्यानंतर कॉंग्रेसने मंडी मतदारसंघातून आश्रय यांना रिंगणात उतरवले. पिता आणि पुत्र कॉंग्रेसमध्ये गेल्याने भाजप सरकारमध्ये मंत्री असणारे अनिल शर्मा काय करणार याबाबत उत्सुकता होती. चर्चेत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शर्मा यांनी भूमिका स्पष्ट केली. आश्रयला कॉंग्रेसने तिकीट दिल्यास मी त्याच्याविरोधात प्रचार करणार नाही, असे मी आधीच भाजप नेतृत्वाला कळवले आहे. मंडी सोडून इतर जागांवरील भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यास मी तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.

शर्मा यांच्याबाबत भाजपची गोची झाल्याचेच दिसून येत आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सत्पालसिंह सत्ती यांनी वेळ मारून नेण्याचाच प्रयत्न केला. प्रसारमाध्यमे त्या प्रकरणाच्या मागे का लागले आहेत? तो शर्मा यांच्या कुटूंबाचा मामला आहे, असे सत्ती म्हणाले. शर्मा यांच्याबाबत भाजप काय करणार, याविषयी पत्रकारांनी अधिक छेडल्यावर काय करायचे ते पाहू, असे त्रोटक उत्तर सत्ती यांनी दिले. तूर्त तरी विखे पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती म्हणून हिमाचलातील घडामोडीकडे महाराष्ट्रातील राजकीय विश्‍लेषक पाहू शकणार आहेत. विखे पाटील यांचे पुत्र सुजय नगरमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)