आठवण : आपलेच असले म्हणून काय झाले… 

नीलिमा पवार

काही शब्द मनात नुसती रुंजी घालत बसतात. अगदी नकळत. कितीही प्रयत्न केला तरी ते मनातून जात नाहीत. उलट विसरण्याचा जितका प्रयत्न करावा तितके जास्त आठवत राहतात. सकाळी व्हाट्‌स ऍपवर कोणीतरी एक कविता पाठवली होती. ती वाचली आणि अगदी काळजात भरून राहिली. कदाचित पूर्वी कधी वाचली असती वा ऐकली असती तर इतकी मनाला भावली नसती. गंमत म्हणून ती वाचली असती आणि सोडून दिली असती. विसरूनही गेले असते. पण या वेळी मात्र ती अगदी काळजात रुतली आहे. आपल्याच भावना, आपल्याच मनातील विचार कोणी प्रकट करावेत असे मला वाटले. त्या कवितेचे शब्द असे काही तरी होते 

पलेच असले म्हणून काय झाले, 
शब्द नेहमीच सोबत करतात असं मुळीच नाही. 
किती तरी वेळा निसटून जातात. अबोल राहतात…. 
किती खरे आहे? 

शब्दही कधी कधी आपल्याला साथ देत नाहीत. सोडून जातात, एकटे पाडतात. कधी अत्युच्च आनंदाच्या क्षणी हे असे होते आणि उत्कट वेदनांच्या वेळीही होते. संतापाच्या वेळीही तसेच होते. काही बोलायचे असते, पण बोलले जात नाही. प्रत्यक्ष शब्द फितुर होतात आणि आयत्यावेळी बदलतात. योजलेले शब्द मनातल्या मनातच दडी मारून राहतात आणि त्याऐवजी मुखावाटे दुसरेच शब्द बाहेर पडतात. वेळ निघून जाते. असे का होते हे कळत नाही.

असे माझे एकटीचेच होत की प्रत्येकालाच हा अनुभव येतो हे ही कळत नाही. पण शब्दांचा तरी काय दोष? बोलून चालून ते तर केवळ शब्दच. निर्जीव. तसे आपले नव्हेत. पण प्रत्यक्षात आपली म्हणावी अशी अगदी रक्‍ताच्या नात्याची, जितीजागती माणसेही साथ देत नाहीत. अगदी आपलीच असूनही. आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर लोटून मोकळी होतात. अशा वेळी वाटते ताडताड बोलावे. मनातील सारी तळमळ बाहेर काढावी. आपल्या सौजन्याचा, चांगूलपणाचा गैरफायदा घेणारांची चांगली खरडपट्टी काढावी. पण तसे होत नाही.

काही माणसांकडे शब्द कसे बेलगाम वागतात. काहींकडे ते अगदी लाजरे बुजरे बनतात. मनात असले तरी जनात येत नाहीत. काही कळत नाही शब्दांचे.
पण काहीही असले, शब्दांवर रागावताही येत नाही. कारण त्यांच्यावासून पदोपदी अडते. आणि कसेही असले, तरी ते आपलेच असतात आणि आपण रागावलो, तरी ते मनावर घेत नाहीत, कधी साद घातली तर जवळव असतात. लगेच धावून येतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)