स्मरण – राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज

साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण

लोकांना सदैव मदतीचा हात देणारे, लोकांच्या समस्यांचे निराकरण करणारे, कर्मयोगी म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल असा माणूस म्हणजे भैय्यूजी महाराज. भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1968 रोजी मध्यप्रदेशातील शुजालपूर येथे झाला होता. तर मृत्यू 12 जून 2018 रोजी झाला. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते.

सुरुवातीच्या काळात मुंबईत एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंगचे काम केले. परंतु आध्यात्माची ओढ असल्याने त्यांचे मन दुसऱ्या क्षेत्रात रमत नव्हते. पुढे त्यांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला. भैय्यूजी महाराजांनी श्री सद्‌गुरू दत्त धार्मिक, परमार्थिक ट्रस्ट, सूर्योदय परिवाराची स्थापना केली सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून महाराजांनी कृषी क्षेत्र, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले. त्याचप्रमाणे मानव जातीच्या पल्याड जावून प्राणीमात्रांचेसुद्धा कल्याण झाले पाहिजे व त्याचबरोबर वृक्षसंवर्धन झाले पाहिजे यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केल्या आणि त्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्याचप्रमाणे दुष्काळमुक्‍तीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे कार्य उभे केले होते.

असंख्य अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. खामगाव तालुक्‍यात त्यांनी 700 मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पारधी समाजाच्या मुलांनी परंपरागत व्यवसायात न जाता शिक्षण घ्यावे व मुख्य प्रवाहात यावे यासाठी त्यांनी मोठे कार्य सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून उभे केले. त्यांनी आश्रमशाळा चालविल्या, बालसुधारगृहे चालविली.

त्याचबरोबर एड्‌सग्रस्त मुलांचे पालकत्वही स्वीकारले. तसेच कोपर्डीला उपलब्ध करून दिलेली मुलींसाठी मोफत बससेवा, सर्वधर्मिय सामुदायिक विवाह, वंचितांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य भैय्यूजी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठीही त्यांनी मदत केली.

तसेच भैय्यूजी महाराजांनी 18 लाख झाडे लावली होती. आदिवासी जिल्ह्यात 1 हजार विहिरी खोदल्या होत्या. सत्कार करताना ते नारळ, शॉल किंवा फुलांचा स्वीकार करत नसत. यावर पैसे खर्च करण्यापेक्षा हे पैसे शिक्षणावर खर्च करायला हवेत असं ते नेहमी म्हणत. या पैशातून त्यांनी जवळपास 10 हजार मुलांना शिष्यवृत्ती दिली होती. आध्यात्मिक, सामाजिक कार्यातून समाज सुधारणेचे कार्य त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून केले. अशाप्रकारे त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप मोठा होता.

त्यांना मध्य प्रदेश सरकारने देऊ केलेले राज्यमंत्रीपद त्यांनी नाकारले होते. नाकारण्यामागील कारण म्हणजे महाराज नेहमी म्हणत असत की, धर्मसत्तेने आपले काम करावे व राज्य सत्तेने आपले काम करावे. भैय्यूजी महाराज कधीच भगवी वस्त्र परिधान करून आणि मोठी दाढी-मिशा ठेवून किंवा जटा वाढवून वावरले नाहीत. ते त्यांना मान्य नव्हते. माणसाने आनंदात राहावे, दुसऱ्यांना आनंद वाटावा असे जगावे व जगू द्यावे ही त्यांची धारणा होती. समाजिक दायित्वाचे जाण व भान असलेल्या या राष्ट्रसंतास व त्यांच्या समर्पित जीवन कार्याला कोटी कोटी प्रणाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)