स्मरण – सवयीचा गुण

योगिता जगदाळे

खाद्या गोष्टीची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की त्यात झालेला बदल स्वीकारायला मन तयार होतच नाही. साधी दारावरच्या बेलची गोष्ट घ्या. एक विशिष्ट प्रकारची बेल ऐकायची सवय झालेली असली, की दुसऱ्या प्रकारची वाजलेली बेल आपले लक्षच वेधून घेत नाही, आमच्या घरी असेच झाले. नुकतेच घराचे इंटिरियर करून घेतले होते., सारी सजावट झाली, घर एकदम नवे नवे वाटू लागले. किचनपासून हॉलपर्यंत आणि फर्निचरपासून ते वॉलपीसपर्यत प्रत्येक गोष्ट बदलली. फार छान वाटू लागले. पण या साऱ्या नव्या नव्यामध्ये काहीसे चुकल्यासारखेही व्हायला लागले. विशेषत: किचनमध्ये. सर्व वस्तू एका विशिष्ट जागी पाहायची सवय झालेली, आता किचन ट्रॉलीज आणि नवी कॅबिनेट आल्याने प्रत्येक वस्तूची जागा बदलली. शोधताना सवयीने वस्तू मग ते एखादे भांडे असो वा डबा असो, शोधण्यासाठी हात जुन्याच जागी जाऊ लागला.
त्याहून गंमत झाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी. घरात मी एकटीच होते, बाहेरचे दार बंद होते. दारावर कोणीतरी धाड धाड वाजवले म्हणून किचनमधून बाहेर आले, दार उघडले, बघितले तर दूधवाला उभा.

मी थोडीशी चिडलेच. “” काय हे? बेल वाजवता येत नाही का? दारावर काय धाडधाड वाजवताय?” मी त्याच्यावर खेकसलेच.
“” उगाच कशाला चिडतायवहिनी, दहा वेळा बेल वाजवली. कोणी दार उघडायलाच तयार नाही. मग काय करणार? वाजवले दार. दूध न देता गेलो असतो, तर उद्या तुम्हीच रागावला असता.”
“” दहा वेळा काय? एकदा तरी वाजवली का बेल? मी किचनमध्येच होते. मला ऐकू नसती आली, वाजवली असती तर? उगाच थापा मारायच्या. हां। कदाचित श्रावणीने बेल बंद करून ठेवली असेल? ” मी स्पष्टीकरण केले.
“” नाही वहिनी, मी बेल वाजवली, ती वाजली, पण तुम्ही ऐकली नाही. मी कशाला खोटे सांगू? आणि दार वाजवायची मला कशाला हौस आहे?” तो म्हणाला.
“” वाजव बरं बेल आता, कशी मला ऐकायला आली नाही ते पाहते.” मी म्हटले.
त्याने माझ्या समोरच बेलचे बटण दाबले. बेल वाजली, पण आवाज आमच्या नेहमीच्या बेलचा डिंग डॉंग आवाज आला नाही. वेगळाच आवाज आला, अगदी नाजूक गोड संगीताचा. मला आपली डिंग डॉंग बेल ऐकायची सवय लागलेली. आता कालच बेलही बदलली हे लक्षातच नाही राहिले. त्यामुळे ही बेल ऐकूनही बाजूला कोणाची वाजली असेल म्हणून मी कानाआड केली.
दूधवाला म्हणत होता तेच खरे होते.
तर हा झाला सवयीचा गुण.
असाच अनुभव शनिवारी आला.
शनिवार होता म्हणून मारुतीला गेले. मारुतीचे दर्शन घेतले आणि मग तशीच शेजारच्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले. तो गणपती दिसेनाच, वेगळेच वाटू लागले. प्रथम पायांकडे लक्ष गेले, तर पाय निळे होते, मग नजर उंचावत वर मस्तकापर्यंत पाहिले.
गणपतीच होता, नेहमीचाच, पण त्याचा रंग बदलला होता. पुर्वीचा गौरवर्ण जाऊन त्याला निळसर रंग दिला होता.
निळसर रंग म्हटले की शंकराचीच मूर्ती समोर उभी राहते; रंग बदलल्यामुळे मला प्रथम तो शंकरच वाटला. नंतर नेहमीचा गणपती दिसला.
हा सवयीची मूर्ती पाहण्याचा परिणाम.
दोन वेळा तसाच अनुभव आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)