स्मरण : सेल्फीचा बळी

योगिता जगदाळे 

व्हाटस ऍपवर एक छोटासा व्हिडियो व्हायरल झाला आहे सध्या. हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या नादात एका युवकाने प्राण गमावले. व्हिडियोत एक मोकळ्या कुरणात चरणारा हत्ती दिसतो. जांभळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक माणूस सेल्फी काढण्यासाठी हत्तीच्या जवळ जाताना दिसतो. तो जवळ जात असताना हत्ती त्याच्यावर चाल करून येतो आणि काही क्षणातच त्याला धक्का मारून पाडतो आणि पायाखाली तुडवून मारतो. त्यानंतर दुसरा एक माणूस जाऊन त्या हत्तीला हाकलून देतो. पाठिमागून एका स्त्रीच्या रडण्या ओरडण्याचा आवाज येताना व्हिडियो संपतो. साधारण अर्ध्या मिनिटाचा हा व्हिडियो मनाला सुन्न करणारा आहे. व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये ही घटना तामीळनाडूमधील मसिनगुडी येथील असल्यचे लिहिले आहे.

सेल्फी घेताना मृत्यू अशा बातम्या अधूनमधून येतच असतात. सेल्फी घेत असताना डोंगरमाथ्यावरून, कड्यावरून, उंच इमारतींवरून पडून माणसे प्राण गमावतात, जखमी होतात. सेल्फी घेताना नदीत वा तलावात बुडून माणसे मरण पावतात. अभयारण्यात गेल्यानंतर तेथील प्राण्यांबरोबर सेल्फी घेताना माणसे जखमी झाल्याची, मरण पावल्याची उदाहरणे आहेतच. अेल्वे स्टेशनवरून रेल्वे जात असताना धावत्या रेल्वेबरोबर सेल्फी घेण्याच्या नादात रेल्वे खाली सापडून अनेकजणांनी प्राण गमावल्यची उदाहरणे समोर आहेत. सेल्फीसाठी इतका धोका का पत्करावा हा एक प्रश्‍न आहे. जीव इतका स्वस्त आहे का?

अशा प्रकारच्या बातम्या नेहमीच येत असतात. पण तरीही त्यापासून बोध घेऊन लोक शहाणे होताना दिसत नाहीत. हे प्रकार होतच राहतात. एका माहितीप्रमाणे सेल्फी घेताना मरण पावणारांच्या संख्येत भारताचा क्रमांक पहिला आहे, ही काही मोठी अभिमानाने मिरवावी अशी गोष्ट नाही, त्या प्रकारात युवावर्गाची संख्या खूप जास्त आहे, जास्त म्हणण्यापेक्षा युवकच असले स्टंट फार करताना दिसतात.

हत्तीबरोबर सेल्फी घेताना मरण पावलेल्या या व्हाटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडियोबाबत आणखी एक धक्कादायक गोष्ट आहे. व्हाटस ऍपवरील पोस्टमुळे अनेक अनर्थ झाल्याच्या गोष्टी आपण ऐकतो. मध्यंतरी गाजत असलेल्या मॉब लिंचिग प्रकरणांनाही काही प्रमाणात व्हाटसऍपच्या पोस्टस कारणीभूत होत्याच.
तसाच काहीसा प्रकार या व्हिडियोबाबत आहे.

ही घटना तामीळनाडूतील मासिनगुडी येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. मसिनगुडी तामीळनाडूतील ऊटी या थंड हवेच्या ठिकाणापासून सुमारे 30 किलोमीटर्स अंतरावर असलेले ठिकाण आहे. निलगिरी जिल्ह्यातील हे ठिकाण एक उत्तम पर्यटन स्थळ आणि मदुमलाई राष्टीय उद्यानतील एक ठिकाण आहे. तेथे हत्तीचे अभयारण्य आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर ही घटना मसिनगुडी येथील असावी यावर सहज विश्‍वास बसतो. पण प्रत्यक्षात ही घटना आहे श्रीलंकेतील. मग हा खोटेपणा का हा मोठा प्रश्‍न पडतो. याचे उत्तर काय?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)