आठवण : जीवन – एक वसुदेव प्याला 

नीलिमा पवार 

काकांनी राजूसाठी एक छोटे खेळणे आणले होते. प्लॅस्टिकचेच होते. त्याचे नाव होते वसुदेव प्याला. कृष्णजन्माच्या कथेवर ते आधारित होते. ती गोष्ट आहे ना, वसुदेव-देवकी तुरुंगात नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला कंसाच्या तावडीतून वाचवण्यासाठी मथुरेला नेत असतो. वाटेत यमुना नदी लागते. टोपलीत ठेवलेल्या बालकृष्णाला वसुदेवाने छातीशी धरलेले असते. नदी पार करताना पाणी वाढत जाते, तसा वसुदेव टोपली उंच उंच धरू लागतो. शेवटी त्याच्य डोक्‍यापर्यंत पाणी येते, तेव्हा कृणाच्या पायाचा नदीच्या पाण्याला स्पर्श होतो आणि नदीचे पाणी अगदी कमी होऊन वसुदेवाला नदी पार करण्यासाठी वाट मिळते. की गोष्ट तर आपणा सर्वांना चांगलीच माहीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गोष्टीवर आधारलेले ते खेळणे होते. प्याल्याच्या आकाराचे एक मोठे भांडे होते. पारदर्शक होते ते. त्यात वसुदेव आणि त्याने डोक्‍यावर घेतलेल्या टोपलीत बालकृष्ण होता. त्या भांड्यात पाणी ओतत राहायचे. भांड्यातले पाणी वाढत राहते. पाण्याची पातळी वाढत असताना आपल्याला दिसत राहते. पाणी वाढते, तसा वसुदेव पाण्यात बुडत जातो. पाणी वाढत वाढत त्याच्या डोक्‍याच्याही वर जाते, पण त्याच्या डोक्‍यावर असलेल्या टोपलीतील बालकृष्णाच्या पायाला पाण्याचा स्पर्श होताच पाणी वाढायचे बंद होते आणि पाण्याची पातळी वाढण्याच्या ऐवजी सारे पाणी वाहून जाते आणि ते भांडे रिकामे होते. जणू यमुना नदीने बालकृष्णाला घेऊन जात असलेल्या वसुदेवाला दुभंगून वाट करून दिली आहे. सर्व मुले ते खेळणे मोठ्या उत्सुकतेने पाहात होती. पुन्हा पुन्हा त्या भांड्यात पाणी भरत होती. ते वाढताना काळजी करत होती आणि कृष्णाच्या पायाला पाणी लागताच ते भांडे रिकामे झालेले पाहून आनंदाने टाळ्या वाजवत होती. मुलांप्रमाणे मोठी माणसेही मुलांचा तो खेळ मोठ्या कौतुकाने बघत होती.

तो खेळ बघणाऱ्या आजीने राजूच्या हातातील ते खेळणे मागून घेतले. अगदी डोळ्यांजवळ नेऊन निरखून पाहिले आणि ते पुन्हा राजूकडे देत हात जोडत ती म्हणाली, सारी देवाची कृपा हो! देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना, ते असे. इतक्‍या मोठ्या पुरातून देवाने वसुदेवाला वाचवले. वाचवणारच, कारण देवच त्याच्याबरोबर होता ना? तो देव आहे, हे वसुदेवाला माहीत नसले म्हणून काय झाले? शेवटी श्रद्धा हीच महत्त्वाची. तुमची पूर्ण श्रद्धा असेल तर यमुनेतून वाटच काय, तुम्ही इकडचा डोंगर तिकडे करू शकता. राजू हसला. म्हणाला, अगं आजी, देव कसला? हा तर खेळ आहे. वसुदेव प्याला म्हणजे वक्रनलिकेवर आधारलेले खेळणे आहे, खेळणे.

मग त्याने वक्रनलिकेची आकृती काढून आजीला दाखवली आणि समजावले की वक्रनलिकेला दोन भुजा (भाग) असतात. आखूड भुजा आणि लांब भुजा. वक्रनलिकेत पाणी भरत भरत जेव्हा आखुड भुजा पाण्याने पूर्ण भरली जाते, तेव्हा त्यातील सगळे पाणे वाहून जाते. या खेळण्यात कृष्णाच्या पायाजवळ वक्रनलिकेची आखुड भुजा ठेवलेली आहे. त्यामुळे वक्रनलिकेची आखुड भुजा भरते तेव्हा कृष्णाच्या पायाजवळ पाणी आलेले असते आणि पायाला पाण्याचा स्पर्श होताच सारे पाणी वाहून जाते. इतके सोपे आहे ते. समजले?

मला काही सांगू नको बाबा. आजी म्हणाली, मला एवढे माहीत आहे, की देव बरोबर वेळेवर मदत करतो. सारी देवाची कृपा. अरे, शेवटी हे खेळणे तयार करण्याची बुद्धी कोणी दिली? सांग बरं! देवानेच ना? अरे त्याने सांगितल्याशिवाय झाडाचे पान हलत नाही. समजले. आता त्यांचा वाद वाढण्याची लक्षणे दिसत होती.

मी म्हटले, राजू, अरे आजीचे पण बरोबर आहे. शेवटी माणसाला कोठेतरी श्रद्धा ठेवावी लागतेच. कोणी कितीही नास्तिक असला, शास्त्रज्ञ असला, तरी जेव्हा त्याचे प्रयत्न हरतात, तेव्हा तो देवाला शरण जातो. सारे देवाच्या हाती आहे म्हणतो.
मी बोलून दाखवले नाही, पण मनात म्हटले, अरे राजा, आपले जीवनही वसुदेव प्यालासारखेच आहे. ते सुखदु:खानी विविध भावभावनांनी भरत जाते. पण एक विशिष्ट बिंदू आला, साऱ्या भावभावना विरून जातात आणि फक्त त्या शक्तीची आठवण येते. मग त्या शक्तीला तुम्ही काहीही नाव द्या. जसा भाव तसा देव माहीत आहे ना?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)